नवी दिल्ली, १३ डिसेंबर २०२२ : भारताच्या राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू, उपराष्ट्रपती आणि राज्यसभेचे अध्यक्ष जगदीप धनखड आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी, लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला, तसेच अनेक कॅबिनेट मंत्री यांनी मंगळवारी (ता. १३) १३ डिसेंबर २००१ रोजी झालेल्या दहशतवादी हल्ल्यादरम्यान संसदेच्या रक्षणासाठी आपल्या प्राणांची आहुती देणाऱ्या भारतमातेच्या या वीरपुत्रांना पुष्पांजली अर्पण करून अभिवादन केले.
१३ डिसेंबर २००१ रोजी नवी दिल्लीतील संसद भवनावर झालेला हल्ला ही अभूतपूर्व घटना होती. या अतिरेकी हल्ल्याने संपूर्ण देशाला हादरवून सोडले. लोकशाहीचे मंदिर समजल्या जाणार्या संसद भवन परिसरात झालेला हा हल्ला आणि जवानांचे रक्तबंबाळ मृतदेह ही देशवासीयांसाठी धक्कादायक बाब होती.
या हल्ल्यात दिल्ली पोलिसांच्या पाच जवानांसह दोन सुरक्षा रक्षकांना हौतात्म्य आले. संसद भवनावरील हल्ल्याच्या घटनेला आज २१ वर्षे पूर्ण होत असली, तरीही त्याच्या आठवणी, तो थरार अजूनही भारतीय जनमानसांत कायम आहे. लोकसभेचे हिवाळी अधिवेशन सुरू असतानाच लष्कर-ए-तोएबा या दहशतवादी संघटनेच्या अतिरेक्यांनी संसदेवर हल्ला केला. लष्कर-ए-तोयबा आणि जैश-ए-मुहम्मदच्या पाच अतिरेक्यांनी १३ डिसेंबर २००१ रोजी सकाळी ११.४० वाजता अॅम्बेसेडर कारमधून संसद परिसरात प्रवेश केला. त्यांच्या येण्यापूर्वीच ४० मिनिटांअगोदर लोकसभा आणि राज्यसभा स्थगित झाली होती. त्यावेळी तत्कालीन गृहमंत्री लालकृष्ण अडवाणी यांच्यासह १०० नेते संसदेत उपस्थित होते.
लोकशाहीचं पवित्र मंदिर; तसेच या मंदिरातील नेतेमंडळींना वाचविण्यासाठी सैन्य दलाच्या जवानांनी बलिदान दिले. या हल्ल्यात दिल्ली पोलिसांचे जवान नानक चंद, रामपाल, ओमप्रकाश, बिजेंद्र सिंह आणि केंद्रीय राखीव पोलिस बलाची महिला कॉन्स्टेबल कमलेश कुमारी आणि संसद सुरक्षेचे दोन सुरक्षा सहायक जगदीश प्रसाद यादव आणि मातबर सिंह नेगी यांनी या हल्ल्यात आपल्या प्राणांची आहुती दिली. दरम्यान, या संपूर्ण अतिरेकी हल्ल्याची योजना राबविणारा अफजल गुरू या अतिरेक्याला १५ डिसेंबर २००१ मध्ये जम्मू-काश्मीर येथून अटक करण्यात आली. त्यानंतर, न्यायालयीन प्रकिया पूर्ण करून त्यास फाशी देण्यात आली. अफजल गुरूला फाशीची शिक्षा देण्यासाठी देशाला तब्बल १२ वर्षे वाट पाहावी लागली. ९ फेब्रुवारी २०१३ रोजी तिहार जेलमध्ये त्याला फाशी देण्यात आली. या हल्ल्यानंतर समाजमाध्यमांद्वारे सातत्याने भारतमातेच्या या वीरपुत्रांना अभिवादन करण्यात येत आहे.
बंदूकधारींनी त्यांचे वाहन भारताचे उपराष्ट्रपती कृष्णकांत (जे त्यावेळी इमारतीत होते.) यांच्या कारमध्ये वळवले आणि त्यांनी गोळीबार सुरू केला. उपराष्ट्रपतींच्या रक्षकांनी आणि सुरक्षा कर्मचाऱ्यांनी दहशतवाद्यांवर गोळीबार केला आणि नंतर कंपाउंडचे दरवाजे बंद करण्यास सुरवात केली. भारतीय सुरक्षा एजन्सी आणि दिल्ली पोलिस अधिकाऱ्यांनी सांगितले, की बंदूकधाऱ्यांना पाकिस्तानकडून सूचना मिळाल्या होत्या आणि पाकिस्तानच्या इंटर-सर्व्हिसेस इंटेलिजन्स (ISI) एजन्सीच्या मार्गदर्शनाखाली ही कारवाई करण्यात आली होती.
न्यूज अनकट प्रतिनिधी : सूरज गायकवाड.