अजित पवार यांचे आज दिवसभराचे सर्व कार्यक्रम रद्द ; राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण

पुणे, १७ एप्रिल २०२३: राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते व विधानसभेचे विरोधी पक्षनेते अजित पवार यांच्याबाबत मागील काही दिवसांपासून विविध राजकीय चर्चा रंगत आहेत. असे असतानाच अजित पवार यांनी सोमवारी दिवसभरात आयोजित केलेले सर्व कार्यक्रम अचानक रद्द केले आहेत. त्यामुळे राजकीय चर्चांना पुन्हा उधाण आले आहे.

राज्यातील सत्ता संघर्षावर न्यायालयाकडून काही दिवसातच निर्णय दिला जाणार आहे. न्यायालयाने जर मुख्यमंत्र्यासह १६ आमदारांना अपात्र ठरवले तर भाजप अजित पवार यांना सोबत घेवून सरकार चालवेल, याबाबत भाजप नेते व अजित पवार यांच्या काही गुप्त बैठकाही झाल्याची चर्चा सध्या राज्यात रंगली आहे. मागील आठवड्यातही अजित पवार पुण्यातील आपले कार्यक्रम रद्द करुन नॉटरिचेबल झाले होते. त्यानंतर तर ते आपल्या समर्थक आमदारांना सोबत घेवून भाजपसोबत जाणार या चर्चेला चांगलेच बळ मिळाले आहे.

यानंतर अजित पवार यांनी आपली तब्येत ठीक नव्हती म्हणून विश्रांतीसाठी घरीच होतो, असे स्पष्टीकरण दिले मात्र त्यानंतरही त्यांच्याबाबतच्या चर्चा थांबण्याचे नाव घेत नाही. केंद्रीय मंत्री अमित शहा मुंबई दौऱ्यावर आले असता, अजित पवार यांनी त्यांची गुप्त भेट घेतल्याची चर्चा कालपासून राज्यात चालू आहे. त्यानंतर त्यांचे सोमवारी दिवसभर पुणे जिल्ह्यात आयोजित केलेले सर्व कार्यक्रम अचानक रद्द केले. यांतच भाजपाचे दोन मोठे नेते तडकाफडकी दिल्लीला रवाना झाल्याने राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आले आहे.

न्यूज अनकट प्रतिनिधी: अमोल बारवकर

कृपया आपले प्रतिक्रिया कळवावी

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा