अफगाणिस्तानच्या पत्रकारानं पाकिस्तानच्या परराष्ट्र मंत्र्यांची केली शाब्दिक धुलाई

अफगानिस्तान, १९ जून २०२१: ११ सप्टेंबर २०२१ पर्यंत अफगाणिस्तानातून अमेरिकन आणि नाटो सैनिक परत आपल्या मायदेशी जाणार आहे. अफगाणिस्तान सरकार आपल्या देशाच्या विकासात भारताची महत्त्वपूर्ण भूमिका पहात आहे. परंतु पाकिस्तान अफगाणिस्तानात भारताच्या उपस्थितीला विरोध करत आहे. अफगाणिस्तानच्या वृत्तवाहिनी टोलो न्यूजला दिलेल्या मुलाखतीत पाकिस्तानचे परराष्ट्रमंत्री शाह मेहमूद कुरेशी हे भारताशी संबंधित प्रश्नांवर अडचणीत सापडताना दिसले. शनिवारी प्रसारित झालेल्या टोलो न्यूजच्या या मुलाखतीत कुरेशी काही ठिकाणी हसताना तर काही ठिकाणी फसताना दिसू शकतात.

कुरेशी यांची ही मुलाखत टोलो न्यूजचे प्रमुख लोतफुल्ला नजफिजादा यांनी घेतली आहे. टोलो न्यूजनं मुलाखतीच्या अनेक क्लिप्स ट्विटरवर शेअर केल्या आहेत. या संभाषणादरम्यान कुरेशी यांनी अफगाणिस्तानात भारताच्या उपस्थितीवर प्रश्न उपस्थित केले आहेत.

लोतफुल्ला नजफिजादा यांच्या प्रश्नावर कुरेशी म्हणाले की, भारत आणि अफगाणिस्तानचे द्विपक्षीय संबंध आहेत. भारताशी द्विपक्षीय संबंध राखणं हा अफगाणिस्तानचा अधिकार आहे. दोन्ही देशांमधील व्यावसायिक संबंधही आहेत. यात पाकिस्तानला कोणतीही अडचण नाही. पण अफगाणिस्तानात भारताची उपस्थिती जेवढी असायला हवी होती त्यापेक्षा अधिक आहे. यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे भारत आणि अफगाणिस्तान यांच्या सीमा एकमेकांशी कोठेही जोडल्या गेलेल्या नाहीत.

त्यानंतर टोलो न्यूजच्या पत्रकारानं कुरेशी यांना विचारलं की, अफगाणिस्तानमध्ये भारताची उपस्थिती तुम्हाला का त्रासदायक वाटत आहे? यावर पाकिस्तानच्या मंत्र्यांनी म्हणालं की जर अफगाणिस्तानच्या भूमीचा वापर पाकिस्तानविरूद्ध असंल तर ते योग्य नाही. टोलो न्यूजनं विचारले की, भारतानं हे केले आहे का? तेव्हा कुरेशी हसू लागले.

अफगाणिस्तानात भारताची किती वाणिज्य दूतावास आहेत? या प्रश्नावर कुरेशी म्हणाले की अधिकृतपणे चार आहेत पण किती अनधिकृत आहेत, हे अफगाणिस्तानला सांगायला हवं. अफगाणिस्तान भारताची सीमा सामायिक करत नाही. टोलो न्यूजनं विचारलं की अफगाणिस्तान आणि भारत यांचे चांगले संबंध आहेत, पाकिस्तानला काय अडचण आहे, मग कुरेशी यांना यावर कोणतेही ठोस उत्तर देता आले नाही.

अफगाण पत्रकाराच्या प्रश्नावर पाकिस्तानचे परराष्ट्रमंत्री अस्वस्थ दिसत होते. लोतफुल्ला नजफिजादा यांनी विचारले की, तालिबानी नेते हैबतुल्लाह अखुंदजादा, मुल्ला याकूब किंवा सिराजुद्दीन हक्कानी पाकिस्तानात नाहीत का? यावर कुरेशी म्हणाले की हा प्रश्न अफगाणिस्तान सरकारला विचारा. कुरेशी यांना व्यत्यय आणत पत्रकारानं सांगितलं की मे महिन्यात तालिबान नेते शेख अब्दुल हकीम अफगाणिस्तानात आपल्या नेत्यांना भेटण्यासाठी आले होते. शेख अब्दुल हकीम यांनी जाहीरपणे सांगितलं की ते पाकिस्तानातून आले आहेत.

यावर कुरेशी हसत हसत म्हणाले की त्यांनी संपर्क साधला नव्हता, त्यामुळं आम्हाला या बद्दल समजलं नाही. कुरेशी म्हणाले की, तालिबान्यांनाही अफगाणिस्तानात शांतता हवी आहे. यावर लोतफुल्ला नजफिजादा यांनी विचारलं की तालिबानला शांतता हवी आहे हे तुम्हाला कसं समजल? त्यांच्याशी चर्चा सुरु असल्याचं शाह मेहमूद कुरेशी यांनी सांगितलं. तालिबान आणि अफगाण सरकार यांच्यात झालेल्या चर्चेत भाग घेऊ शकत नसल्याचं पाकिस्तानी मंत्र्यांनी सांगितलं. यावर लोतफुल्ला नजफिजादा म्हणाले की अशी कोणतीही चर्चा झालेली नाही. कुरेशी यांना याबाबत कोणतेही ठोस उत्तर देता आले नाही आणि ते म्हणाले की अफगाणिस्तानला पुन्हा दुसर्‍या गृहयुद्धाचा सामना करता येणार नाही.

पाकिस्तान आणि अफगाणिस्तानला आंतरराष्ट्रीय सीमा म्हणून विभाजित करणाऱ्या डुरंड लाईनचा विचार करण्याच्या प्रश्नावर कुरेशी म्हणाले की, जर अफगाणिस्तानला चांगल्या शेजार्‍यांप्रमाणे सहवासाची भावना असेल तर ती आंतरराष्ट्रीय सीमा म्हणून स्वीकारली जावी. यावर ते अफगाणिस्तानाशी बोलणार आहे का? पाकिस्तानी परराष्ट्रमंत्र्यांनी सांगितले की आम्हाला असा विश्वास आहे की अफगानिस्तान या गोष्टीशी सहमत असेल किंवा नसेल परंतु ही सीमाच आहे. डुरंड लाइन ही आंतरराष्ट्रीय सीमा आहे. यावर चर्चा करण्याची गरज नाही.

न्यूज अनकट प्रतिनिधी: ईश्वर वाघमारे

कृपया आपले प्रतिक्रिया कळवावी

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा