भाजपला मोठा धक्का, १८ नगरसेवकांचा कुटुंबासह राष्ट्रवादीत प्रवेश

जळगाव, १४ फेब्रुवरी २०२१: ऐन पालिका निवडणुकांच्या तोंडावर भाजपसाठी पहिला मोठा धक्का बसला आहे. एकनाथ खडसे यांनी भाजपला राम राम ठोकल्यानंतर भाजपमधील नेते राष्ट्रवादीत येण्याचा सिलसिला सुरूच आहे. ऐन निवडणुकीच्या तोंडावर पुन्हा एकदा भाजपमधील अनेक नेते राष्ट्रवादीत प्रवेश करताना दिसत आहे. जळगावात माजी मंत्री एकनाथराव खडसे यांचा करिष्मा आता दिसू लागला आहे असंच म्हणावं लागणार आहे. भाजपला सोडचिठ्ठी देताच खडसेंनी आता आपली पॉवर दाखवण्यास सुरुवात केली आहे.

याचे कारण असे आहे की, भुसावळमधील १८ विद्यमान नगरसेवक आणि १३ माजी नगरसेवक व कुटुंबियांनी जळगाव इथे राष्ट्रवादी परिवार संवाद कार्यक्रमात जलसंपदामंत्री जयंत पाटील यांच्या उपस्थितीत राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केला. या कार्यक्रमाला राष्ट्रवादीचे सर्व कार्यकर्ते व नेते मंडळी मोठ्या संख्येने उपस्थित होते.  वल्लभभाई पटेल सभागृहात हा प्रवेशाचा कार्यक्रम पार पडला.

या नेत्यांनी केला राष्ट्रवादीत प्रवेश

भाजपमधून जिल्हा सरचिटणीस प्रा. डॉ. सुनिल नेवे, नगराध्यक्ष रमण भोळे यांच्या पत्नी सौ. भारती भोळे, नगरसेविका पती देवा वाणी, भाजपचे माजी अध्यक्ष दिनेश नेमाडे आणि अनेक माजी नगसेवक व आजी माजी नगरसेवकांनी यावेळी राष्ट्रवादीत प्रवेश केला. यावेळी एकूण ३१ जणांनी राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केला. मंत्री पाटील यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे चिन्ह असलेले मफलर घालून प्रवेश केलेल्यांचा सत्कारकेला.

न्यूज अनकट प्रतिनिधी: ईश्वर वाघमारे

कृपया आपले प्रतिक्रिया कळवावी

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा