नाशिकमध्ये सिटी लिंक वाहकांचे पुन्हा काम बंद आंदोलन, प्रवाश्यांचे हाल

नाशिक, १८ जुलै २०२३: सिटी लिंक बसच्या वाहकांनी आज काम बंद आंदोलन केले. पगार द्या, पगार द्या अशी घोषणाबाजी देखील करण्यात आली. यामुळे सकाळ पासून सिटी लिंक बस सेवा पूर्णपणे विस्कळित झाली आहे. प्रवाश्यांचे आंदोलनामुळे मोठ्या प्रमाणात हाल झाल्याचे दिसून आले आहे.

सिटी लिंक बस डेपो, तपोवन या ठिकाणी सकाळच्या सुमारास सिटी लिंक बस सेवेत कार्यरत असलेल्या वाहकांनी आंदोलन केले. गेल्या दोन महिन्यांपासून पगार होत नसल्याने त्यांनी आंदोलन पुकारले आहे. महापालिकेच्या अटी आणि शर्तीचा भंग केल्याने, सिटी लिंक कडून ठेकेदाराला झालेला दंड हा कर्मचाऱ्यांच्या पगारातून वसूल करण्याचा ठेकेदाराचा इरादा असल्यानेच वाहकांचा पगार थांबविण्यात आल्याचे बोलले जात आहे.

आधीच दोन महिने पगार नाही. त्यात दंड कसा भरायचा असा पेच कर्मचाऱ्यांसमोर उभा राहिला आहे. संप करु नये याकरिता दबाव तंत्राचा वापर केला जात असल्याचे संपकऱ्यांचे म्हणणे आहे. याबाबत पोलीस ठाणे, मनपा आयुक्त व कामगार आयुक्त यांना देखील पत्रव्यवहार केल्याचे समजते. थकीत पगार मिळावा, दरमाह पगार वेळेवर व्हावा. अश्या मागण्या या वाहकांच्या आहेत.

न्युज अनकट प्रतिनिधी : अमोल बारवकर

कृपया आपले प्रतिक्रिया कळवावी

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा