ग्रामीण भागातील पीएमपीच्या सेवा बंद करण्याचा निर्णय

पुणे, ५ डिसेंबर २०२२ : शहरात दोन प्रकारच्या बस आढळून येतात. एक पीएमपी, तर दुसरी एसटी. नियमानुसार पीएमपीची सार्वजनिक वाहतूक व्यवस्था ही शहरापुरतीच मर्यादित आहे. तर शहराबाहेर जायचं असल्यास एसटीचा उपयोग करता येतो. अर्थात, एसटी राज्यभर सेवा पुरवते. आणि म्हणूनच पीएमपी प्रशासनाने शहराबाहेरील ग्रामीण मार्गावरील ११ मार्गांसह निगडी लोणावळ्याचा बारावा मार्गसुद्धा नुकताच बंद केला आहे.

एसटी संपाच्या काळात पीएमपी प्रशासनाने ग्रामीण भागात आपली सेवा सुरू केली; परंतु संपला तरी पीएमपीने ग्रामीण भागातील आपली सेवा बंद केली नाही. याचा परिणाम शहरातील नागरिकांच्या प्रवासावर झाला. पीएमपी बस शहराबाहेर जात असल्याने नागरिकांना मुबलक सेवा देण्यास पीएमपीला अडचणी येत होत्या. म्हणूनच १२ मार्गांसह आणखी ४० मार्ग बंद करण्याचे नियोजनही केले गेले आहे. पीएमपीची सेवा बंद करण्याचा निर्णय ओम प्रकाश बकोरिया यांचा अध्यक्षतेखाली घेतला गेला. १२ मार्ग बंद करणे हा त्यातील पहिला टप्पा होय.

ग्रामीण भागातील पुढील मार्ग बंद झाले आहेत-
१. स्वारगेट ते काशिंगगाव,२. स्वारगेट ते बेलावडे, ३. कापूरहोळ ते सासवड,४. कात्रज सरपोद्यान ते विंजर,५. हडपसर ते मोरगाव, ६. चाकण, आंबेठाण चौक ते शिक्रापूर ७. सासवड ते उरळीकांचन, ८. वाघोली ते राहू गाव, पारगाव सालु मालु, ९. मार्केट यार्ड ते लव्हार्डे, १०. सासवड ते यवत, ११. हडपसर ते जेजुरी आणि १२. निगडी ते लोणावळा.

नियमानुसार पीएमपीला महापालिका हद्दीबाहेर बससेवा सुरू करण्यासाठी एसटीची परवानगी गरजेचे असते; परंतु पीएमपी सेवा ग्रामीण भागात सुरू करण्यामागचा उद्देश वेगळा होता. आता त्याची काही गरज नसल्याने ही सेवा बंद करणे गरजेचे आहे. त्यातून पीएमपीने ग्रामीण मार्ग सुरू करताना कोणतीही परवानगी घेतली नव्हती. त्यामुळे पीएमपीला याचा आर्थिक फटका बसण्याची शक्यता आहे.

न्यूज अनकट प्रतिनिधी : ऋतुजा पंढरपुरे

कृपया आपले प्रतिक्रिया कळवावी

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा