सरकारमध्ये आहे म्हणून मोर्चा काढायचा नाही का? आमदार बच्चू कडू यांचा सवाल

अमरावती, ९ ऑगस्ट २०२३ : आमदार बच्चू कडू यांच्या नेतृत्वात अमरावतीत जन एल्गार मोर्चा काढण्यात आला. अमरावतीच्या विभागीय आयुक्त कार्यालयावर हा मोर्चा काढण्यात आला. शेतकऱ्यांच्या विविध मागण्यांसाठी हा मोर्चा काढण्यात आला.या मोर्चात बोलताना बच्चू कडूंनी सरकारला मोठा इशारा दिला. आजचा मोर्चा इथपर्यंत मर्यादित नाही, आम्ही महाराष्ट्र पिंजून काढू. आमचे नाते जात आणि धर्माशी नाही तर आमचे नाते दुःखी लोकांशी आहे. सरकारमध्ये आहे म्हणून मोर्चा काढायचा नाही का? असा सवाल बच्चू कडू यांनी यावेळी केला.

मी मुख्यमंत्र्यांना पाठिंबा दिला तेव्हा त्यांनी असे म्हटले की पाठिंबा द्या. पण मोर्चा काढू नका. हा मोर्चा ५० हजार जणांचा आहे. पुढचा ५ लाख जणांचा असेल. दोन महिने झाले की सरकारकडे मागणी करा. ३० वर्षांपूर्वी काँग्रेस जे अनुदान देत होत ते अनुदान शिंदे सरकारने वाढवले. कामे रोहयोमधून व्हावे, भाव देण्याची औकात कोणत्याच सरकारची नाही म्हणून आम्ही स्वामीनाथन आयोगाची मागणी करत आहोत. नोकरी नाही तर प्रकल्पग्रस्ताला निधी द्या. आम्ही नोकरीवर पाणी सोडले, मंत्री पदावर पाणी सोडले. या राज्यात विरोधात बोलणारे विरोधी पक्ष संपले. सत्तेत राहून कामपण करायचे आहे. प्रत्येक जिल्ह्यात जाऊन काम करायचे आहे. आपल्या रक्तातच आंदोलन आहे. आंदोलन करत राहू. आपल्याला तीन महिने मेहनत करायची आहे, असे बच्चू कडू म्हणाले.

आमची युती कोणासोबत नाही झाली तरी चालेल पण आपली युती मजूर, शेतकऱ्यासोबत करू. तीन महिने आम्ही वाट पाहतो. आम्ही लढायला तयार आहोत. आम्ही सरकारकडे जाणार नाही, सरकार आमच्याकडे येईल, असे मोठे वक्तव्य बच्चू कडू यांनी केले.या मोर्चाच्या माध्यमातून आम्हाला जनजागृती करायची आहे. तसेच एक नवीन चळवळ उभी करायची आहे. आम्ही धर्म, जात, पंथ याच्यासाठी लढणारे नाहीत. खरंतर मुद्द्यावर लढले पाहिजे, मुद्द्यावर सरकारसोबत असले पाहिजे. त्यासाठी हे आंदोलन करतोय. तसेच हा वार सरकारवरच आहे, पण थोडा सौम्य गतीने आहे. याची सुरुवात आहे. ९ ऑगस्ट हा क्रांती दिवस आहे. या दिवशी नवीन क्रांती या राज्यात आणि देशात घडायला हवी. त्यासाठी आम्ही जनआंदोलन करतोय.आंदोलन म्हणजे वार थोडी होतोय. आंदोलन हे जनजागृतीसाठी आणि नवीन चळवळीसाठीसुद्धा असते, असे बच्चू कडू म्हणाले.

न्यूज अनकट प्रतिनिधी : अनिल खळदकर

कृपया आपले प्रतिक्रिया कळवावी

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा