गंमत म्हणून त्याने फोटो ट्विट केला आणि चक्क हॉलिवूड अभिनेत्रीनं त्याला रिप्लाय दिला

बरेली (उत्तर प्रदेश) २७ सप्टेंबर २०२०: कुणाचं नशीब कधी आणि कसं चमकेल हे काही सांगता येत नाही. उत्तर प्रदेशात राहणाऱ्या एका सामान्य घरातल्या आकाश नावाच्या तरुणाला चक्क हॉलिवूड अभिनेत्री अलेक्झांड्रा डॅडारियो हिनं रिप्लाय दिला आहे. त्यामुळे बरेलीच्या या तरुणाला सध्या चांगलाच भाव मिळू लागलाय. 

त्याचं झालं असं की, सोशल मीडियावर सध्या #CoupleChallenge हा ट्रेंड सुरु आहे. त्यामुळे बरेचजण आपल्या पत्नी, प्रेयसीसह स्वतःचे फोटोज शेअर करत आहे. मात्र उत्तर प्रदेशात राहणाऱ्या या पठ्ठयानं कहरच केला. त्यानं त्याच्या ट्विटर अकाउंट वरून एडिट केलेला एक फोटो शेयर केला. या फोटोत तो मास्क घालून एका शेतात आहे, आणि त्याच्यासोबत चक्क हॉलीवूड अभिनेत्री अलेक्झांड्रा डॅडारियो शेतात उभी असल्याचं या एडिट केलेल्या फोटोमध्ये दाखवण्यात आलं आहे. या फोटोला ”Haters will say this is photoshopped” म्हणजेच ”जळणारे लोकं म्हणतील कि हे फोटोशॉप केलेलं आहे.” असं कॅप्शन देत त्यानं #CoupleChallenge हा हॅशटॅग वापरला आहे. 

२४ सप्टेंबरला पोस्ट केलेला हा फोटो थेट अलेक्झांड्रा डॅडारियोने ट्विटरवर बघितला. तो फोटो तिला इतका गंमतीशीर वाटला कि तिनं तो फोटो रिट्विट केला आणि ”This was such a fun weekend” म्हणजेच ”हा एक गंमतीशीर विकेंड होता” असं लिहीत तिने आपला आनंद व्यक्त केला. अलेक्झांड्रा डॅडारियोने आपला फोटो रिट्विट केल्याचं समजताच आकाशचा आनंद गगनात मावेनासा झाला. ही बातमी नेटीझन्समध्ये वाऱ्यासारखी पसरली आणि अनेकांनी हे ट्विट रिट्विट केलं आहे. सध्या या ट्विटला १ लाख ४० हजारांपेक्षा जास्त लाईक्स मिळाले असून १६ हजारांपेक्षा जास्त लोकांनी हे ट्विट रिट्विट केलंय आणि ही संख्या वाढतच आहे. 

दरम्यान उत्तर प्रदेशातल्या या सामान्य तरुणाला हॉलिवूड अभिनेत्रीनं दिलेल्या एका रिप्लायमुळे आकाशवर सध्या शुभेच्छांचा वर्षाव होत असून अनेक प्रसारमाध्यांनी त्याची दखल घेतली आहे. सध्या आकाशला तात्पुरता का होईना पण सेलिब्रिटीचा दर्जा प्राप्त झालायं. एका ट्विटची ही कमाल आहे. 

न्यूज अनकट प्रतिनिधी: अक्षय बैसाणे

कृपया आपले प्रतिक्रिया कळवावी

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा