आपत्कालीन बैठकीत मोदी म्हणाले- आंतरराष्ट्रीय उड्डाणं सुरू करण्याच्या निर्णयाचा विचार करू, यावेळी कोणतीही चूक नको

नवी दिल्ली, 28 नोव्हेंबर 2021: दक्षिण आफ्रिकेत सापडलेल्या कोरोनाचे नवीन व्हेरीयंट ओमिक्रॉनच्या भीतीमुळं जगभरातील निर्बंध सुरू झाले आहेत.  या व्हेरीयंटवर चर्चा करण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शनिवारी अधिकाऱ्यांची तातडीची बैठक बोलावली.  नवीन व्हेरीयंटबाबत आतापासूनच सतर्क राहण्याची गरज असल्याचं त्यांनी सांगितलं.  आंतरराष्ट्रीय प्रवासात सूट देण्याच्या योजनांचाही पुन्हा आढावा घ्यावा, असंही त्यांनी अधिकाऱ्यांना सांगितलौ.
 दक्षिण आफ्रिकन व्हेरीयंटबाबत मोदींच्या 6 सूचना
 1. आपल्याला आतापासून नवीन प्रकारासाठी तयारी करावी लागेल.
 2. ज्या भागात जास्त प्रकरणं येत आहेत, तेथे पाळत ठेवणं आणि प्रतिबंध करणं यासारखी कठोरता चालू ठेवावी.
 3. लोकांनी अधिक सतर्क राहण्याची गरज आहे.  मास्क आणि सोशल डिस्टन्सिंगसारख्या गोष्टींचं योग्य पालन केलं पाहिजे.
 4. आंतरराष्ट्रीय प्रवासावर सवलत देण्याच्या योजनेचा आढावा घेण्यात यावा.
 5. कोरोना लसीच्या दुसऱ्या डोसची व्याप्ती वाढवण्यावर लक्ष केंद्रित केलं पाहिजे.
 6. ज्यांना पहिला डोस मिळाला आहे, त्यांना दुसरा डोस वेळेवर द्यावा याकडं राज्यांना लक्ष द्यावं लागंल.
मोदींच्या अध्यक्षतेखाली ही बैठक अशा वेळी बोलावण्यात आलीय जेव्हा जगभरातील देश आफ्रिकेत सापडलेल्या कोरोनाच्या नवीन व्हेरीयंटबद्दल घाबरले आहेत.  दक्षिण आफ्रिकेच्या नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ इन्फेक्शियस डिसीजेसने सांगितलं – देशात आतापर्यंत या व्हेरीयंटचे 22 प्रकरणे आढळून आली आहेत.  शास्त्रज्ञांनी त्याला B.1.1.529 असं नाव दिलं आहे.  हे व्हेरीयंट ऑफ सीरियस कंसर्न  म्हणून वर्णन केलं आहे.
सीएम केजरीवाल यांची केंद्र सरकारकडं मागणी
दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी कोरोनाच्या नवीन व्हेरीयंटचा फटका बसलेल्या देशांच्या उड्डाणांवर बंदी घालण्याची मागणी केली आहे.  सीएम केजरीवाल म्हणाले की, आपला देश मोठ्या कष्टानं कोरोनापासून सावरलाय.  हा नवीन व्हेरीयंट भारतात येऊ नये यासाठी आपण शक्य ते सर्व प्रयत्न केले पाहिजेत.
 भारतानेही कठोर पावलं उचलली आहेत
 सर्व विमानतळांना हाँगकाँग, बोत्सवाना आणि इस्रायलमधून येणाऱ्या प्रवाशांची तपासणी करण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत.  केंद्र सरकारने राज्यांना विशेष दक्षता घेण्याच्या सूचना दिल्या आहेत.  राज्यांना दक्षिण आफ्रिका, हाँगकाँग, बोत्सवाना आणि इस्रायलमधून येणाऱ्या प्रवाशांची कसून तपासणी करण्यास सांगण्यात आलं आहे.  कोणत्याही प्रकारची बेफिकीर बाळगू नका.
 राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशांना लिहिलेल्या पत्रात, आरोग्य सचिव राजेश भूषण म्हणाले – पॉझिटिव्ह आढळलेले नमुने त्वरित जीनोम सिक्वेन्सिंग प्रयोगशाळेत पाठवावेत.  देशाच्या राष्ट्रीय रोग नियंत्रण केंद्राने देखील या व्हेरीयंटबद्दल चेतावणी दिलीय.
न्यूज अनकट प्रतिनिधी: ईश्वर वाघमारे

कृपया आपले प्रतिक्रिया कळवावी

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा