पुरंदरच्या दक्षिण पूर्व पट्ट्यात जोरदार पाऊस आणि सोसाट्याच्या वाऱ्याने उभी पिकं झाली भुईसपाट.

पुरंदर,७ सप्टेंबर २०२०: पुरंदर तालुका कायम दुष्काळी भाग म्हणून ओळख असलेल्या दक्षिण पूर्व पट्ट्यात काल रात्री जोरदार वादळी वाऱ्यासह पावसाने दमदार हजेरी लावली. यामुळे काढणीला आलेलया बाजरीसह उभा ऊस भुईसपाट झाला आहे. शेतात मोठ्या प्रमाणावर पाणी आल्याने काढणीला आलेली बाजरी आता पाण्यात लोळत आहे. जोरदार झालेल्या पावसामुळे ढगफुटी झाल्यासारखी परिस्थिती निर्माण झाली आहे.

 

पुरंदरच्या या दुष्काळी पट्ट्यात दोन तास पाऊस झाला तरी थांबायचे नावच घेईना, शेतात पाणी, घरात पाणी, दुकानात पाणी, त्यात लाईट नाही. जीव मुठीत धरुन येथील जनता पाऊस थांबायची वाट पाहत होती. परंतु कोरोनाने हैरान झालेली जनता या ढगफुटीने त्रस्थ झाली आहे. कायम पाचवीला दुष्काळ पुजलेल्या पुरंदर तालुक्यातील राख, रणवरेवाडी, कर्नलवाडी, गुळूंचे या अवर्षणग्रस्त गावात यावर्षी पावसाचे सरासरी प्रमाण वाढले आहे. वळवाचे तीन व मौसमात सलग दहा दिवस पाऊस पडला होता तोच आधी जास्त होता. त्यात भर आता काल शनिवारी रात्री व रविवारी पहाटे मोठ्या प्रमाणावर पाऊस व सोसाट्याचा वारा सुटला होता. त्यामुळे काढणीला आलेली बाजरी अक्षरशः पाण्यात भिजत आहे. आज उद्या बाजरी काढण्याचे नियोजन शेतकरी करत असतानाच काल रात्री मोठ्या वेगाने वारा वाहू लागला आणि शेतकऱ्यांच्या मनात पाल चुकचुकली आणि सकाळी तसेच दृश्य समोर दिसले. सगळ्या शिवारातील बाजरी भुईसपाट झाली असून पाण्यात भिजत आहे.

या सोसाट्याच्या वाऱ्याचा आणि पावसाचा फटका तेथील उसाच्या पिकालाही बसला आहे.पुढील हंगामात कारखान्याला गाळपासाठी जाणार ऊस कालच्या सोसाट्याच्या वाऱ्याने भुईसपाट झाला आहे. आठ ते दहा फुट वाढलेला ऊस डोळ्या देखत पाण्यात लोळतानाचे दृष्य पाहून लोकांना अश्रू अनावर झाले आहेत. इतर पिकांचे ही मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे. ओढ्या नाल्यांना ही मोठ्या प्रमाणावर पाणी आले आहे. कधी नव्हते तेवढे पाणी आता शेतातून वाहताना पहायला मिळत आहे. मागील महिन्यात ही अशाच प्रकारे सलग दहा दिवस पाऊस झाल्याने ब्राह्मणदरा येथील रस्ता व शेतातील बांध वाहून गेले होते. त्यावेळीच ओल्या दुष्काळाची चाहूल शेतकऱ्यांनी व्यक्त केली होती. महसुल प्रशासनाने त्यावेळीही शेतकऱ्यांना भरपाई देण्यात टाळाटाळ केली. आता तरी वेळीच नुकसानीचे पंचनामे करावेत अशी अपेक्षा शेतकरी व्यक्त करत आहेत.


न्यूज अनकट प्रतिनिधी राहुल शिंदे

कृपया आपले प्रतिक्रिया कळवावी

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा