अमित शहांचा वाढला कार्यभार, सहकार मंत्रालयाचा मिळाला पदभार

नवी दिल्ली, ८ जुलै २०२१: बुधवारी केंद्रीय मंत्रिमंडळाचा विस्तार करण्यात आला. एकीकडे अनेक नवीन चेहर्‍यांना मंत्रिमंडळात प्रवेश मिळाला असताना काही मंत्र्यांनाही बढती देण्यात आली. मंत्रिमंडळाच्या विस्तारानंतर भाजपचे माजी अध्यक्ष आणि विद्यमान केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांचा कार्यभार आणखी वाढला आहे. त्यांना सहकार मंत्रालयाची जबाबदारीही देण्यात आली आहे.

दुसरीकडं पीएम मोदी यांनी विज्ञान आणि तंत्रज्ञान मंत्रालयाला प्राधान्य दिलेय. भारतात वैज्ञानिक नवकल्पना येताच भारत जगातील अव्वल स्थानावर रहावा यासाठी भारत प्रयत्नशील आहे. खासकरुन कोविडच्या काळात. विज्ञान आणि तंत्रज्ञान मंत्रालयाचा कार्यभार पीएमओच्या ताब्यात असेल आणि पंतप्रधान मोदी या मंत्रालयावर सक्रियपणे देखरेख करत राहतील.

अमित शाह हे सांस्कृतिक, पर्यटन आणि ईशान्य मंत्रालयांची देखभाल करतील. ईशान्येकडील संस्कृती आणि पर्यटनाला चालना मिळेल याची खात्री करुन घेतील. पंतप्रधान मोदींच्या मंत्रिमंडळात ४३ नेत्यांनी मंत्री म्हणून शपथ घेतली आहे. मंत्रिमंडळ विस्तारात ७ मंत्र्यांना पदोन्नती देण्यात आली तर ३६ नव्या चेहर्‍यांचा मंत्रिमंडळात समावेश करण्यात आला. मोदी मंत्रिमंडळात ज्योतिरादित्य शिंदे, नारायण राणे, सर्बानंद सोनोवाल, पशुपती कुमार पारस, मनसुख मंडावीया आणि भूपेंद्र यादव यांच्यासह इतर अनेक नेत्यांचा समावेश करण्यात आलाय.

१३ मोठे चेहरे मंत्रिमंडळातून बाहेर पडले

थावरचंद गहलोत यांना मंत्रिमंडळ विस्तारामुळं प्रथम मंत्रिमंडळातून काढून टाकलं गेलं. यानंतर डॉ. हर्षवर्धन, रविशंकर प्रसाद, प्रकाश जावडेकर, बाबुल सुप्रियो, रावसाहेब दानवे पाटील, देवोश्री चौधरी, रमेश पोखरीयल निशंक, सदानंद गौडा, संतोष गंगवार, संजय धोत्रे, रतन लाल कटारिया, प्रताप सारंगी यांच्यासह १२ नेत्यांकडून राजीनामा घेण्यात आला. म्हणजेच एकूण १३ नेत्यांना मोदी मंत्रिमंडळातून बाहेरचा रस्ता दाखविण्यात आला.

या नेत्यांना पदोन्नती मिळाली

पंतप्रधान मोदींनी किरेन रिजिजू, राम कुमार सिंह, हरदीपसिंग पुरी, मनसुख मांडवीया, पुरुषोत्तम रुपाळ, जी किशन रेड्डी, अनुराग ठाकर यांना पदोन्नती देऊन त्यांना कॅबिनेट मंत्री केलं.

न्यूज अनकट प्रतिनिधी: ईश्वर वाघमारे

कृपया आपले प्रतिक्रिया कळवावी

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा