जेट एअरवेज संस्थापक नरेश गोयल यांना ईडीकडून अटक, ५३८ कोटी रुपयांच्या घोटाळ्याचा गंभीर आरोप

नवी दिल्ली, २ सप्टेंबर २०२३ : एका मोठ्या बातमीनुसार, अंमलबजावणी संचालनालयाने (ED) जेट एअरवेज (इंडिया) लिमिटेडचे संस्थापक नरेश गोयल यांना, शुक्रवारी बँक फसवणुकीशी संबंधित एका मोठ्या मनी लॉन्ड्रिंग प्रकरणात अटक केली. त्यांच्यावर ५३८ कोटी रुपयांच्या घोटाळ्याचा आरोप आहे. आज म्हणजेच शनिवारी, २ सप्टेंबर रोजी ७४ वर्षीय गोयल यांना विशेष पीएमएलए न्यायालयात हजर केले जाईल. येथे आज ईडी त्यांच्या कोठडीची मागणी करणार आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, जेट एअरवेज (इंडिया) लिमिटेडचे संस्थापक नरेश गोयल यांना शुक्रवारी ईडीच्या मुंबई कार्यालयात चौकशीसाठी बोलावण्यात आले होते. त्याच वेळी, दीर्घ चौकशीनंतर, मनी लाँडरिंग प्रतिबंधक कायद्यांतर्गत (पीएमएलए) त्यांना अटक करण्यात आली. यापूर्वी दोनदा ईडीच्या समन्सवर ते हजर झाले नव्हते.

वास्तविक हे संपूर्ण प्रकरण केंद्रीय अन्वेषण ब्यूरो (CBI) ने यावर्षी मे २०२३ मध्ये नोंदवलेल्या FIR वर आधारित आहे. नरेश गोयल यांची पत्नी अनिता, जेट एअरवेजचे माजी संचालक गौरांग आनंद शेट्टी आणि इतर काही जणांचाही या प्रकरणातील आरोपींच्या यादीत समावेश आहे.

२०१९ पासून जेट एअरवेजची उड्डाणे बंद आहेत. जून २०१९ मध्ये, NCLT ने जेट एअरलाइनला दिवाळखोर घोषित केले होते. खरं तर वाढत्या कर्जाच्या ओझ्यामुळे कंपनी १७ एप्रिल २०१९ रोजी बंद झाली होती. सध्या त्याचे संस्थापक नरेश गोयल यांना मनी लाँड्रिंग प्रकरणात अटक करण्यात आली आहे.

न्यूज अनकट प्रतिनिधी : सूरज गायकवाड

कृपया आपले प्रतिक्रिया कळवावी

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा