आता नवीमुंबईतच घेता येणार तिरुपती बालाजीचे दर्शन

नवी मुंबई,७ जून २०२३ : आता तिरुपती बालाजीचे दर्शन घेण्यासाठी तिरुमला, तिरुपतीला जाण्याची गरज नाही. महाराष्ट्रातील जनतेला आता नवीमुंबईतच तिरुपती बालाजीचे दर्शन घेता येणार आहे. नवी मुंबईतल्या उलवेनोडमध्ये तिरुपती बालाजीचे भव्य मंदिर उभारण्यात येणार आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते आज सकाळी प्रति तिरुपती बालाजी मंदिराचे भूमिपूजन करण्यात आले. यावेळी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासह राज्य मंत्रिमंडळातील मंत्री, नवी मुंबईतील आमदार, खासदार आणि स्थानिक नेते मोठ्या प्रमाणावर उपस्थित होते.

आज भल्या सकाळी ६.४५ वाजता मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी उलवेनोड येथील प्रति तिरुपती बालाजी मंदिराचे भूमिपूजन केले. यावेळी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, तिरुपती तिरुमला संस्थानचे मिलिंद नार्वेकरही उपस्थित होते. विधीवत पूजा अर्चाना करत या मंदिराचे भूमिपूजन करण्यात आले.

यावेळी कार्यक्रमस्थळी मोठी गर्दी झाली होती. विशेष म्हणजे भल्या पहाटे या मंदिराचं भूमिजपून करण्यात आलेले असतानाही नागरिकांची मोठी गर्दी होती. स्थानिक नेते आणि कार्यकर्तेही सहभागी होते. तिरुपती तिरुमाला बालाजी संस्थानच्या वतीने हे मंदिर उभारण्यात येत आहे. महाविकास आघाडी सरकार असतानाच या मंदिराच्या उभारणीचा निर्णय घेण्यात आला होता. त्यानुसार आज भूमिपूजन सोहळा पार पडला.

तिरुपती बालाजी मंदिराच्या धर्तीवर नवी मुंबईत श्री व्यंकटेश मंदिराची उभारणी करण्यात येणार आहे. नवी मुंबईतील उलवेनोड येथील जागा यासाठी निश्चित करण्यात आली होती. राज्य सरकारने ५०० कोटी रुपयांची १० एकर जागा नवी मुंबईत बालाजी मंदिर उभारण्यासाठी दिले होते. तिरुपती तिरुमाला मंदिराच्या व्यवस्थापनाकडून नवी मुंबईत मंदिराची प्रतिकृती उभारण्यासाठी ७० कोटी रुपये खर्च करण्यात येणार आहे. या रकमेची उभारणी दात्यांकडून आणि भक्तांकडून आलेल्या देणगीतून करण्यात येणार आहे.

न्यूज अनकट प्रतिनिधी – अनिल खळदकर

कृपया आपले प्रतिक्रिया कळवावी

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा