भारतीय संघाचे कर्णधार हार्दिक पांड्या कडून कौतुक

नवी दिल्ली, २१ नोव्हेंबर २०२२ : संपूर्ण भारतात सध्या चर्चा रंगली आहे ती भारत आणि न्यूझीलंड यांच्यातील ‘टी- २०’ मालिकेची. खरंतर मालिकेतील पहिला सामना पावसाच्या कारणास्तव रद्द करावा लागला होता; परंतु दुसऱ्या ‘टी २०’ सामन्यात भारताने विरुद्ध संघ न्यूझीलंडला पराभूत केले आहे. न्यूझीलंड संघाला भारताबरोबर बरोबरी साधण्यासाठी पुढचा सामना जिंकणं महत्त्वाचा आहे. कर्णधार हार्दिक पांड्या देखील खूप खूश आहे आणि त्याने संघाचेही भरपूर कौतुक केले आहे.

कर्णधार हार्दिक पांड्या म्हणतो, “यापेक्षा चांगले काहीही असू शकत नाही. सर्वच मनापासून खेळले; पण सूर्याकडून निश्चितच एक अनोखा खेळ पाहायला मिळाला. आम्ही १७० ते १७५ धावा करण्याबाबत बोलत होतो. गोलंदाजी देखील शानदार होती. मैदान खूप ओले होते, त्यामुळे याचे श्रेय गोलंदाजांनाही जाते. मी खूप गोलंदाजी केली आहे. त्यामुळे पुढे जाऊन मला गोलंदाजीचे आणखी पर्याय पाहायचे आहेत. नेहमीच आसेल असं नाही; पण फलंदाजांनीही गोलंदाजी करावी, असं मला वाटतं. मी त्यांच्याकडून साजेशी खेळी करण्याची अपेक्षा करतो जी त्यांनी सार्थ ठरवली आहे. सर्वच खेळाडू एकमेकांना मिळालेल्या यशाबद्दल आनंदी असतात हे मी अनेकवेळा या संघात पाहतो आहे. त्यामुळे संघातील प्रत्येकाला मला संधी द्यायची आहे. एकच सामना उरल्याने प्रत्येकाला संधी देणे हे माझ्यासाठी नवीन आव्हान आहे.”

न्यूझीलंड संघ १८.५ षटकांत १२६ धावांवर सर्व बाद झाला आणि भारताने ६५ धावांनी मोठा विजय मिळविला. भारतीय फिरकीपटूंनी सांघिक खेळ करून भारताला विजय मिळवून दिला हे नक्कीच. दीपक हुड्डाने ४, तर मोहम्मद सिराज आणि युझवेंद्र चहल यांनी प्रत्येकी २ विकेट घेतल्या. याशिवाय भुवनेश्वर कुमार आणि वॉशिंग्टन सुंदर यांनी प्रत्येकी १ विकेट घेण्यात यश मिळवले. भारताने दिलेल्या १९२ धावांच्या आव्हानाचा पाठलाग करताना न्यूझीलंड संघाला घाम फुटला.

न्यूज अनकट प्रतिनिधी : ऋतुजा पंढरपुरे

कृपया आपले प्रतिक्रिया कळवावी

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा