पुरंदर येथील जोशी बंधूंची पक्षांसाठी धडपड.

नीरा: एकीकडे लॉकडाऊन सुरू असताना सोशल डिस्टन्सिंग पाळत व तोंडाला मास्क लावून गुळुंचे (ता.पुरंदर) येथील शिक्षक बंधू प्रवीण व प्रशांत जोशी यांच्यासह काही तरुण डोंगर व माळरानावर पक्षांसाठी अन्न व पाणी ठेवत आहेत. त्यांच्या या कामाचे परिसरातून कौतुक होत असुन अनेकांनी या तरुणांच्या पाठीवर कौतुकाची थाप टाकली आहे.
प्रवीण जोशी हे सातारा जिल्हा परिषदेच्या माण तालुक्यात प्राथमिक शाळेत मुख्याध्यापक म्हणून कार्यरत असून त्यांचे विविध सामाजिक कामात योगदान असते. तर त्यांचे बंधू प्रशांत हे पुण्यातील राणी लक्ष्मीबाई सैनिकी शाळेत शिक्षक आहेत.
कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी शासनाने लॉक डाऊन जाहीर केले त्याला आता जवळपास एक महिना होत आला. सध्या उन्हाळा सुरू असून सुगीचे दिवसही संपले आहेत. त्यामुळे पक्षांना अन्न व पाणी उपलब्ध होत नसल्याचे लक्षात आल्यावर येथील पोलीस पाटील दिपक जाधव तसेच संजय चव्हाण, निखिल खोमणे, विनोद गोरगल, सचिन पाटोळे, संदीप काळे या तरुणांनी पुरंदर व बारामती तालुक्यांच्या सीमेवरील रुपाडी डोंगर व माळरानावर पक्षांना अन्न व पाणी झाडावर टांगून ठेवण्यास सुरुवात केली.
जोशी बंधूंच्या या उपक्रमाला स्थानिक ग्रामपंचायत, पत्रकार भरत निगडे, राहुल शिंदे यांचेही सहकार्य मिळत आहे. सध्या दशक्रिया विधींचे घाट ओस असून यासाठी फार कमी प्रमाणात लोक उपस्थिती लावतात. हे लक्षात घेऊन घाटावरच्या कावळ्यांसाठी भाताचे पिंड तयार करून ठेवण्यास या तरुणांनी सुरुवात केली आहे. जोशी बंधू यासाठी स्वतः पिंड ठेवत असून हे तरुण रोज पायपीट करत चिमण्या व रानपाखरांच्या संवर्धनासाठी प्रयत्न करत आहेत.
“मानवाची जीवनशैली समृद्ध होत असताना पक्षी, वन्यजीव यांचे अधिवास सुरक्षित राहून त्यांना अनुकूल वातावरण निर्माण करणे हे आपले कर्तव्य आहे. याच भावनेतून आम्ही सध्या पक्ष्यांसाठी काम करत आहोत. शिवाय आम्हा तरुणांच्या संघटनेकडून अन्नधान्य वाटप करणे, मास्क तयार करणे अशी इतरही समाजोपयोगी कामे सुरू आहेत असे प्रशांत जोशी यांनी ’न्यूज अनकट’शी बोलताना सांगितले.

प्रतिनिधी- राहुल शिंदे

 

कृपया आपले प्रतिक्रिया कळवावी

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा