‘राज ठाकरे उग्रवादी नेता, आम्ही 3 मे रोजी मशिदीचा लाऊडस्पीकर वाचवू’- रामदास आठवले

मुंबई, 24 एप्रिल 2022: महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे प्रमुख राज ठाकरे यांनी 3 मे रोजी मशिदींवरील लाऊडस्पीकर हटवण्याची धमकी दिल्यानंतर राजकारण अधिकच तापलं. याप्रकरणी केंद्रीय मंत्री रामदास आठवले यांनी राज ठाकरेंवर निशाणा साधत त्यांना उग्रवादी नेता म्हटलंय.

रामदास आठवले म्हणाले की, मशिदीचे लाऊडस्पीकर काढण्याची मनसेची भूमिका योग्य नाही. ते म्हणाले, 3 मे रोजी जेव्हा मनसे कार्यकर्ते मशिदीतील लाऊडस्पीकर काढण्यासाठी जातील तेव्हा त्यांचे कार्यकर्ते मशिदीबाहेर उभे राहतील, जेणेकरून लाऊडस्पीकरचा बचाव करता येईल.

आठवलेंनी असा दिला राज ठाकरेंना सल्ला

राज ठाकरेंना सल्ला देताना रामदास आठवले म्हणाले, ‘लाऊडस्पीकर हटवण्याची मागणी करण्यापेक्षा त्यांनी मंदिरांसाठी अतिरिक्त लाऊडस्पीकर लावावेत. भगवा हा आपल्या पक्षाचा झेंडा आणि वेशभूषा मानून राज ठाकरे यांनी हिंसेचा मार्ग स्वीकारलाय, असं ते म्हणाले.

काय आहे संपूर्ण प्रकरण?

महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने जाहीर केलंय की, 3 मे रोजी अक्षय्य तृतीयेच्या मुहूर्तावर पक्षाचे कार्यकर्ते महाराष्ट्रभर लाऊडस्पीकर वापरून ‘महा आरती’ करतील. तत्पूर्वी, मुंबईतील एका कार्यक्रमात बोलताना राज ठाकरे यांनी महाराष्ट्र सरकारला धमकी दिली होती की, जर 3 मेपर्यंत मशिदींमधून लाऊडस्पीकर हटवले नाहीत, तर त्यांचे कार्यकर्ते मशिदींसमोर हनुमान चालीसाचं पठण करतील. लाऊडस्पीकरचा मुद्दा धार्मिक नसून सामाजिक आहे, असं राज ठाकरे म्हणाले होते.

मुंबई पोलिसांनी विशेष केली तयारी

राज ठाकरेंच्या या धमकीनंतर मुंबई पोलीस प्रशासन सतर्क झाले आहे. मशिदीसमोर हनुमान चालीसा वाजल्यानंतर जातीय तणाव निर्माण होऊ शकतो अशा संवेदनशील भागांची ओळख मुंबई पोलिसांनी केली आहे. या भागांसाठी विशेष तयारी करण्यात आलीय.

न्यूज अनकट प्रतिनिधी: ईश्वर वाघमारे

कृपया आपले प्रतिक्रिया कळवावी

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा