पुणे दि.८ सप्टेंबर २०२० :सध्या सर्वत्र कोरोनाचा प्रादुर्भाव वाढतो आहे. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर सुरुवातीपासून पत्रकार प्रशासनास सहकार्य करीत आहेत. कोरोनाबाधित पत्रकारांची वाढती संख्या आणि विद्यमान व्यवस्थेत त्यांची होणारी हेळसांड टाऴण्यासाठी प्रत्येक शासकीय आणि धर्मदाय आयुक्तांच्या अखत्यारित येणार्या खासगी रूग्णालायात बाधित पत्रकारांसाठी राखीव बेडची व्यवस्था करावी अशा मागणीचे जिल्हाधिकारी डाँ. राजेश देशमुख यांना पुणे जिल्हा पत्रकार संघाने निवेदन देवून सविस्तर चर्चा केली. यावेळी त्यांच्यासमवेत पुणे जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी आयुष प्रसाद उपस्थित होते. यावेळी निवासी उपजिल्हाधिकारी डाँ. जयश्री कटारे यांनाही हे निवेदन देण्यात आले.
कोविड-१९ ने बाधित होणार्या पत्रकारांची वाढती संख्या आणि रूग्णालयांमध्ये उपचारासाठी गेलेल्या पत्रकारांची होणारी हेळसांड लक्षात घेऊन रूग्णालायांत पत्रकारांसाठी राखीव बेडची व्यवस्था व्हावी अशा मागणीचे निवेदन राज्यातील सर्व जिल्हा पत्रकार संघानी द्यावे असे आवाहन मराठी पत्रकार परिषदेचे मुख्य विश्वस्त एस. एम. देशमुख यांनी केले होते. त्यानुसार मराठी पत्रकार परिषदेचे कार्याध्यक्ष शरद पाबळे व पुणे विभागीय सचिव बापूसाहेब गोरे यांच्या सूचनेनुसार पुणे जिल्हा
पत्रकार संघाने हे निवेदन तातडीने दिले आहे .
पुणे येधील जिल्हाधिकारी कार्यालयात निवेदन व चर्चेप्रसंगी पुणे जिल्हा पत्रकार संघाचे अध्यक्ष सुनील लोणकर, परिषद प्रतिनिधी एम.जी. शेलार, जिल्हा समन्वयक सुनील नाना जगताप, जिल्हा प्रसिद्धीप्रमुख सुनील वाळुंज, कार्यकारीणी सदस्य दादाराव आढाव, अमित टाकळकर, हवेली पत्रकार संघाचे सचिव अमोल भोसले, संघटक सुनील सुरळकर धिवर, प्रमोद गव्हाणे, उपस्थित होते.
पुणे जिल्हा पत्रकार संघाने यावेळी जिल्हाधिकारी डॉ. राजेश देशमुख यांच्याशी चर्चा करीत असताना राज्यात कोरोनामुळे मृत पावलेल्या पत्रकारांच्या कुंटुंबियांना राज्यशासनाने केलेल्या घोषणेप्रमाणे ५० लक्ष रुपयांची मदत तातडीने देण्यात यावी तसेच पुणे येथे कोरोनामुळे मृत्यू पावलेले तरुण पत्रकार पांडुरंग रायकर यांचा मृत्यू त्यांना वेळेवर उपचार न मिळाल्याने झाला आहे. रायकरांचे निधन हा अनास्थेचा बळी असल्याची संतप्त भावना राज्यातील माध्यम जगतात उमटली, रायकर यांना अॅम्बुलन्स मिळाली असती आणि त्यांना ऑक्सिजन मिळाला असता तर एक तरूण, उमदा पत्रकार आपणास सोडून गेला नसता. तसेच दोषी असणाऱ्यांवर कारवाई करावी अशी मागणीही केली.
जिल्हाधिकारी डॉ. राजेश देशमुख यांनी पुणे जिल्हा पत्रकार संघाच्या शिष्टमंडळाला सर्व मागण्यांचा प्राधान्याने विचार करुन वरिष्ठांना तातडीने कळवून पत्रकारांना न्याय देण्याची भूमिका घेवू असे आश्वासन दिले.
यावेळी पुणे येथे जिल्हाधिकारी डॉ राजेश देशमुख यांना निवेदन देताना पुणे जिल्हा पत्रकार संघाचे पदाधिकारी शेजारी मुख्य कार्यकारी अधिकारी आयुष प्रसाद होते.
न्यूज अनकट प्रतिनिधी- ज्ञानेश्वर शिंदे