मंगळवेढा येथील पाच तिर्थक्षेत्रांना दहा कोटीचा निधी मंजूर – आ. आवताडे

मंगळवेढा, १७ मार्च २०२४ : ग्रामीण भागातील तिर्थक्षेत्रांच्या ठिकाणी देवदर्शनासाठी भाविक आणि यात्रेकरुंची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. अशा ठिकाणी भाविक आणि यात्रेकरु यांना विविध सोयी-सुविधा संबंधित स्थानिक स्वराज्य संस्थांना त्यांच्या तुटपुंज्या उत्पन्नामुळे पुरविणे शक्य होत नाही. म्हणून शासनाने ग्रामीण भागातील तिर्थक्षेत्रांचा विकास करण्यासाठी तीर्थक्षेत्र विकास योजना राबवली असून सध्या शासनाने पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर ग्रामीण यात्रा स्थळ योजना अंमलात आणली आहे. सरकारने ब वर्गात असलेल्या देवस्थानांना दोन कोटी ऐवजी पाच कोटीचा निधी उपलब्ध करून देण्यास सुरुवात केली आहे. यामध्ये मंगळवेढा तालुक्यातील श्री क्षेत्र आरळी येथील नरसिंह देवस्थानसाठी पहिल्यांदाच चार कोटी ५९ लाख रुपये निधी उपलब्ध झाला असून या निधीतून देवस्थानच्या भौतिक विकासाची कामे करण्यात येणार आहेत अशी माहिती आमदार समाधान आवताडे यांनी दिली.

मंगळवेढा तालुक्यातील आरळी, मुंढेवाडी, शिरनांदगी, हुलजंती, बोराळे येथे असणाऱ्या तीर्थक्षेत्रांना दहा कोटी दोन लाख रुपये निधी मंजूर केला असून यामधून या गावातील तीर्थक्षेत्रांचा विकास करण्यात येणार आहे. ‘मी आमदार झाल्यानंतर अरळी या देवस्थानचा तीर्थक्षेत्र ब वर्गात समावेश करून ४ कोटी ५९ लाख रुपये निधी मंजूर केला आहे. या निधीमधून १ कोटी ७३ लाखाचे पुरुष भक्त निवास बांधणे, १ कोटीचे महिला भक्त निवास बांधणे, २६ कोटी रुपयांचे पुरुष व महिला स्वतंत्र स्वच्छतागृह बांधणे, ५२ लाख रुपयांचा रस्ता करणे, ५० लाख रुपयांची संरक्षक भिंत बांधणे आणि ३० लाख रुपये पाणीपुरवठा सोयी सुविधा करणे असा खर्च अरळी येथील नरसिंह देवस्थानसाठी करण्यात येणार आहे. त्याचबरोबर मुंढेवाडी व शिरनांदगी या देवस्थानांचा ब वर्गात समावेश असूनही अद्याप निधी मिळाला नव्हता त्या देवस्थानांनाही ग्रामविकास मंत्री गिरीश महाजन यांनी मुंढेवाडीसाठी आणि शिरनांदगीसाठी प्रत्येकी दोन कोटी रुपये मंजूर करून दिले आहेत. तसेच हुलजंती देवस्थानसाठी १ कोटी ७ लाख रुपये व बोराळे देवस्थानला ३६ लाख रुपये मंजूर झाले असून या देवस्थानची कामेही लवकरच सुरू करण्यात येणार आहेत. तालुक्यातील अनेक देवस्थानाना दिवसेंदिवस भक्तांची गर्दी वाढत असून त्या देवस्थानचा विकास करण्यासाठी निधीची आवश्यकता असते. या देवस्थानचा विकास करण्यासाठी शासन स्तरावर निधीसाठी पाठपुरावा सुरू असून क वर्ग, ब वर्ग, अ वर्गात असणाऱ्या देवस्थानांना निधी मिळवून जास्तीत जास्त निधी मतदार संघात आणण्याचा माझा प्रयत्न असणार आहे’, असे आमदार समाधान आवताडे यांनी बोलताना सांगितले.

न्यूज अनकट प्रतिनिधी : दगडू कांबळे

कृपया आपले प्रतिक्रिया कळवावी

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा