नवाब मलिक यांच्या आरोपानंतर समीर वानखेडे यांचं सडेतोड उत्तर

मुंबई, 22 ऑक्टोंबर 2021: आर्यन खान प्रकरणानंतर एनसीबीचे क्षेत्रीय संचालक समीर वानखेडे आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते नवाब मलिक यांच्यामध्ये सातत्याने आरोप-प्रत्यारोप होत आहेत. समीर वानखेडे हा एक नंबरचा बोगस माणूस आहे. ‘एनसीबी’च्या (NCB) माध्यमातून भाजपवाल्यांसाठी हजारो कोटींच्या वसुलीचा धंदा त्यांनी चालवला आहे. या सगळ्याचे पुरावे देऊन वानखेडेंची नोकरी घालवल्याशिवाय आणि त्यांना तुरुंगात टाकल्याशिवाय मी थांबणार नाही,’ असं वक्तव्य नवाब मलिक यांनी केलं होतं. यानंतर राज्याचे अल्पसंख्याक मंत्री नवाब मलिक यांच्या आरोपांवर मुंबई एनसीबीचे झोनल डायरेक्टर समीर वानखेडे यांनी पत्रकार परिषद घेत सडेतोड उत्तर दिलं.
आरोपांचे खंडन करत समीर वानखेडे म्हणाले की, आमच्या कार्यालयीन कामकाजांवरुन वैयक्तिक पातळीवर खालच्या पातळीत आणि घाणेरडे आरोप केले जात असल्याचं वानखेडे यांनी म्हटलं. मलिकांनी आपल्या मृत आईवर, निवृत्त वडिलांवर आणि बहिणीवर चुकीचे आणि गंभीर आरोप केले. त्यांचं मी खंडन करतो. तसेच त्यांनी बहिणीच्या इन्स्टाग्राम अकाउंटवर जाऊन जासूसी केली, असं देखील समीर वानखेडे आक्रमकपणे म्हणाले.
समीर वानखेडे नेमकं काय म्हणाले?
“त्यांनी केलेले आरोप प्रोफेशनलिझम असतील तर मला त्यावर काहीच आक्षेप नाही. एका मृत महिलेवर तुम्ही आरोप करत आहात. माझी बहीण जी लहान मुलांची आई आहे, तिच्या इन्स्टाग्राम अकाउंटवर जाऊन तुम्ही तिची जासूसी करत आहात. एक वृद्ध माजी सैनिकावर आरोप करत आहात. कशासाठी? तर जे देशासाठी काम करत आहेत त्याच्यावरुन. आम्ही जे प्रोफेशनल काम करत आहोत, कारवाईवरुन तुम्ही वैयक्तीक टार्गेट करत आहात. पण यातून माझ्यावर काहीही परिणाम होणार नाही. माझे मनौधैर्य खालवणार नाही”, असं समीर वानखेडे रोखठोकपणे म्हणाले.
“वारंवार गेल्या 15 दिवसांपासून माझी मृत आई, माझे निवृत्त वडील आणि बहिणीवर घाण शब्दांमध्ये टीका केली जात आहे. मी या गोष्टीचं खंडन करतो. ते खूप मोठे मंत्री आहेत. त्यांना लोकांचा अपमान करण्याचा कदाचित अधिकार असू शकतो. पण मी खूप लहान सरकारी कर्मचारी आहे. मी माझं काम करतोय. जर देशाची सेवा करण्यासाठी आणि अँटीड्रग्ज ऑपरेशन करण्यावरुन जेलमध्ये टाकत असतील तर मी त्याचं स्वागत करतो”, अशी भूमिका त्यांनी मांडली.
न्यूज अनकट प्रतिनिधी: ईश्वर वाघमारे

कृपया आपले प्रतिक्रिया कळवावी

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा