शिवसेनेने केली कालच्या जाहिरातीत दुरुस्ती, आजच्या जाहिरातीत फडणवीस, बाळासाहेब आणि आनंद दिघेंचा फोटो

पुणे १४ जून २०२३ : शिवसेनेने काल १३ जून रोजी सर्व वर्तमानपत्रांमध्ये, राष्ट्रात मोदी, महाराष्ट्रात शिंदे अशी जाहिरात प्रसिद्ध केली होती. या जाहिरातीमुळे राजकारण चांगलेच तापले होते. आज शिवसेनेने पुन्हा पहिल्या पानावर जाहिरात दिली आहे. या जाहिरातीमध्ये मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस या दोघांचा फोटो आहे. तसेच, जाहिरातीत वरच्या बाजूला बाळासाहेब ठाकरे, आनंद दिघे, नरेंद्र मोदी आणि अमित शाह यांचे फोटो दिसत आहेत. त्याचबरोबर लोकप्रियतेची टक्केवारीही बेरीज करून सादर केली आहे.

कालच्या जाहिरातीवर आरोप प्रत्यारोप झाल्यानंतर, जाहिराती मधील चूक दुरुस्त करण्यात आलेली आहे. आज पुन्हा एकदा वर्तमानपत्रामध्ये नव्याने जाहिरात प्रसिद्ध करण्यात आली. या नव्या जाहिरातीमध्ये मात्र एकनाथ शिंदे यांच्यासह देवेंद्र फडणवीस यांचा फोटो आहे. दोघांच्या नेतृत्वाला महाराष्ट्राने साथ दिली आहे, अशी ग्वाही दिली जात आहे. नरेंद्र मोदी यांच्या साथीने विकासाचे पर्व महाराष्ट्रात आले आहे, अशी मांडणी यामध्ये आहे. महत्त्वाचे म्हणजे, कालच्या जाहिरातीमध्ये देवेंद्र फडणवीस यांना डिवचण्याचा प्रयत्न झाला होता, तो दुरुस्त केला गेला आहे. परंतु भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जेपी नड्डा यांचा फोटो मात्र जाहिरातीत दिसत नाही.

आजच्या जाहिरातीमध्ये देवेंद्र फडणवीस यांचा फोटो त्यासोबतच भारतीय जनता पार्टीचे चिन्ह असलेले कमळ त्याच्या जोडीला शिवसेनेचे धनुष्यबाण प्रकाशित करण्यात आले आहे. या सरकार मधील महत्त्वाच्या मंत्र्यांचे फोटो ही प्रकाशीत करण्यात आले आहेत. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासोबत देवेंद्र फडणवीस यांचा मोठा फोटो आहे.

काल प्रकाशित झालेल्या जाहिरातीनंतर मुख्यमंत्र्यांनी आपण ही जाहिरात दिलेलीच नव्हती अशी भूमिका घेतली. शिवसेनेच्या मंत्र्यांनीही प्रतिक्रिया देताना सारवासारव केली होती. त्याचबरोबर भाजपच्या प्रवक्त्यांनी देखील प्रतिक्रिया दिली होती. मुख्यमंत्र्यांनी कोल्हापूर येथे जाहीर कार्यक्रमात देवेंद्र फडणवीस यांचे कौतुक केले आज प्रकाशित केलेल्या जाहिरातीमुळे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी भाजपच्या दबावासमोर नरमाईची भूमिका घेतल्याची दिसते.

काल प्रकाशित केलेल्या जाहिरातीमध्ये केवळ मोदी आणि शिंदे यांचेच फोटो होते. त्यावरून विरोधकांनी शिवसेनेवर टीका केली होती. आनंदाच्या क्षणी शिंदे हे बाळासाहेबांना विसरले, अशी टीका ठाकरे गटाने केली होती. तसेच, या जाहिरातींमुळे भाजपच्या गोटातही नाराजी आणि अस्वस्थता पसरल्याचे समजते. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आपला नियोजित कोल्हापूर दौरा, प्रकृतीचे कारण देत रद्द केला होता. हे वादळ शमविण्यासाठी म्हणून शिवसेनेने आज पुन्हा जाहिरात दिली असे बोलले जात आहे.

न्यूज अनकट प्रतिनिधी- अनिल खळदकर

कृपया आपले प्रतिक्रिया कळवावी

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा