कांदा साठवणुकीवर निर्बंध घातल्यामुळं राज्य कांदा उत्पादक शेतकरी संघटना आक्रमक

महाराष्ट्र, २६ ऑक्टोंबर २०२०: यंदा देशभरात परतीच्या पावसानं चांगलाच धुमाकूळ घातला आहे. याचा मोठा परिणाम शेतीवर झालाय. शेतीचं मोठ्या प्रमाणावर नुकसान होऊन अनेक पीकं वाया गेली आहेत. याचा फटका कांद्याला देखील बसलाय. त्यामुळं कांद्याचे भाव गगनाला भिडले आहेत. कांद्याचे वाढते दर स्थिर ठेवण्यासाठी केंद्र सरकार वेगवेगळे उपाय योजतायत. सर्वप्रथम सरकारनं निर्यातीवर बंदी घातली आणि त्यानंतर आता कांदा साठवणुकीवर देखील केंद्र सरकारनं बंदी घातली आहे. कांदा साठवणुकीवर निर्बंध घातल्यामुळं व्यापाऱ्यांनीच कांद्याचे लिलाव बंद केले आहेत. केंद्राने अवघ्या २५ टनापर्यंत कांद्याला साठवणीकरता परवानगी दिली आहे, त्यामुळं कांदा उत्पादक शेतकरी संघटना आक्रमक झाल्याचं पाहायला मिळालं आहे. कांद्याचे भाव वाढल्यामुळं साठवणुकीवर मर्यादा घालण्यात आली आहे.

केंद्र सरकारच्या या निर्णयानंतर आता महाराष्ट्र राज्य कांदा उत्पादक शेतकरी संघटना आक्रमक झालीय. मनमाड-बाजार समितीत कांद्याचा लिलाव बेमुदत बंद करण्यात आला आहे. तर पिंपळगाव-बसवंतमध्येही व्यापाऱ्यांनी कांद्याचे लिलाव रद्द केलेत.

लिलाव बंद असल्याने शेतकऱ्यांची मोठी गैरसोय होतीच. खरेदी केलेला कांदा पडून असल्याचंही व्यापाऱ्यांनी सांगितलं आहे. लिलावात सहभागी होणार नसल्याचंही व्यापाऱ्यांकडून स्पष्ट करण्यात आलं आहे. विशेष म्हणजे दोन दिवसांपूर्वी कांदा उत्पादकांनी लासलगाव बाजार समितीत कांद्याचे लिलाव बंद पाडले होते.

न्यूज अनकट प्रतिनिधी: ईश्वर वाघमारे

कृपया आपले प्रतिक्रिया कळवावी

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा