काबुलमधील गुरुद्वारावर दहशतवादी हल्ला, ISIS आणि तालिबानमध्ये गोळीबार, गार्डचा मृत्यू

अफगाणिस्तान, 18 जून 2022: अफगाणिस्तानची राजधानी काबूल येथील गुरुद्वारा कारते परवान येथे शनिवारी सकाळी दहशतवाद्यांनी हल्ला केला. दहशतवाद्यांनी येथे अनेक स्फोट घडवले. या हल्ल्यात गुरुद्वाराचा मुस्लिम सुरक्षा रक्षक ठार झाला. तिघांना बाहेर काढण्यात आले. त्यापैकी दोघांना जखमी अवस्थेत रुग्णालयात पाठवण्यात आले.

अद्याप 4-5 लोक बेपत्ता

काबूलमधील कारतेपरवान गुरुद्वारा समितीचे सदस्य तलविंदर सिंग चावला यांनी घटनास्थळाबाहेरील ताजी परिस्थिती सांगितली आहे. चावला यांनी सांगितले की, दहशतवादी अजूनही गुरुद्वारामध्येच आहेत. आमचे 4 ते 5 लोक तीन-चार तासांपासून बेपत्ता आहेत. 2 ते 3 लोकांना आतून बाहेर काढण्यात आले आहे. या सर्वांना जखमी अवस्थेत रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.

सध्याच्या तालिबान सरकारचे रक्षक तिथे पोहोचले आहेत पण हे लोक कोणालाही आत येऊ देत नाहीत, असे तलविंदर सिंग चावला यांनी म्हटले आहे. दहशतवादी अजूनही आत असून तेथून सतत गोळीबाराचे आवाज येत आहेत. संपूर्ण गुरुद्वारा आगीच्या विळख्यात आहे, संपूर्ण गुरुद्वाराला आग लागली आहे. ते म्हणाले की, येथे सातत्याने 5 ते 7 स्फोट झाले आहेत.

या हल्ल्यांबाबत माध्यमांच्या प्रश्नांना उत्तर देताना परराष्ट्र मंत्रालयाचे (एमईए) अधिकृत प्रवक्ते अरिंदम बागची म्हणाले की, पवित्र गुरुद्वारावरील हल्ल्याच्या वृत्तामुळे आम्ही खूप चिंतित आहोत. आम्ही परिस्थितीवर बारकाईने लक्ष ठेवून आहोत आणि घटनेच्या माहितीची वाट पाहत आहोत.

हल्ल्यामागे ISIS खोरासानचा हात

या हल्ल्यामागे ISIS खोरासानचा हात असल्याची माहिती समोर आली आहे. हा हल्ला सकाळी 7.15 वाजता (भारतीय वेळेनुसार 8.30 वाजता) सुरू झाल्याचे सांगण्यात आले. गुरुद्वाराचे रक्षण करताना 3 तालिबानी सैनिक जखमी झाले. तालिबानी सैनिकांनी दोन हल्लेखोरांना घेरले. गुरुद्वारामध्ये सकाळच्या प्रार्थनेसाठी 25-30 अफगाण हिंदू आणि शीख उपस्थित होते, असे सांगण्यात आले. हल्लेखोर आवारात घुसताच 10-15 जण पळून जाण्यात यशस्वी झाले. बाकीचे आत अडकले आहेत.

7-8 लोक आत अडकले

भाजप नेते मनजिंदर सिंग सिरसा यांनी सांगितले की, त्यांनी गुरुद्वारा कारतेपरवानचे अध्यक्ष गुरनाम सिंग यांच्याशी चर्चा केली आहे. गुरनाम यांनी अफगाणिस्तानातील शीखांना जागतिक पाठिंबा देण्याचे आवाहन केले आहे. सिरसा यांनी सांगितले की, आतापर्यंत 3 लोक (गुरुद्वारातून) निघून गेले आहेत, त्यापैकी २ जणांना रुग्णालयात पाठवण्यात आले आहे. गुरुद्वाराच्या मुस्लिम रक्षकाची गोळ्या झाडून हत्या करण्यात आली. 7-8 लोक अजूनही आत अडकले असल्याची शक्यता वर्तवली जात आहे, परंतु आकड्यांची पुष्टी झालेली नाही. अजूनही गोळीबार सुरूच आहे.

न्यूज अनकट प्रतिनिधी: ईश्वर वाघमारे

कृपया आपले प्रतिक्रिया कळवावी

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा