यावर्षी नीरेतील सर्व गणेश मंडळे गणपती बसवणार एकाच मंडवात

पुरंदर, २१ ऑगस्ट २०२०: पुरंदर तालुक्यातील मोठी ग्रामपंचायत म्हणून ओळख असलेल्या, त्याचबरोबर गणेश उत्सवाची मोठी परंपरा व गणेश मंडळाची संख्याही मोठी असलेल्या निरा शहरातील तरुण मंडळ व ग्रामपंचायत प्रशासनाने एक चांगला निर्णय घेतला असून यावर्षी सर्व मंडळातील गणपती एकाच जागेवर एकाच मंडपात बसवले जाणार आहेत. काल रात्री गणेश मंडळ व ग्रामपंचायत प्रशासन यांच्या संयुक्त बैठकीत झालेल्या चर्चेनंतर हा निर्णय घेण्यात आला.

जेजुरी पोलिस स्टेशनचे प्रभारी अधिकारी सहाय्यक पोलीस निरीक्षक अंकुश माने यांनी दोन दिवसापूर्वी झालेल्या गणेश मंडळ, ग्रामस्थ व पोलीस प्रशासन यांच्या बैठकीमध्ये एक गाव एक गणपती ही संकल्पना राबविण्याचे आवाहन केलं होतं. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर रोगाचा संसर्ग वाढू नये म्हणून आपण सर्व ती खबरदारी घेऊयात, असे ते म्हणाले होते. सध्या नीरा शहरात कोरोनाचे २१ रुग्ण आहेत. त्यामुळे हा संसर्ग वाढण्याचा धोका निर्माण झाला होता. त्याच पार्श्वभूमीवर काल रात्री येथील सर्व राजकीय पदाधिकारी व गणेश मंडळ यांची एक संयुक्त बैठक निरा ग्रामपंचायतीच्या सभागृहात पा रपडली.

यामध्ये एक गाव एक गणपती करण्याचे ठरले. मात्र, अनेक मंडळांनी गणपतीच्या मूर्ती खरेदी केलेल्या असल्याने या मुर्ती एकाच ठिकाणी बसविण्याचे सर्वानुमते ठरले. खरेदी केलेल्या गणेश मूर्ती घरी ठेवणे अशक्य असल्याने तरुण मंडळी हा निर्णय घेतला. त्यामुळे आता नीरा येथील पोलीस चौकीच्या मोकळ्या जागेत गणेश मंडळातील गणेश मूर्ती बसवल्या जाणार आहेत. त्यामुळे चौकाचौकात किंवा वार्डात होणारा गणेशोत्सव यावर्षी होणार नाही. यासाठी नीरा विकास आघाडी व चव्हाण पॅनल या दोन्ही गटाच्या नेत्यांनी पुढाकार घेत एक आदर्श निर्माण केला आहे. काल झालेल्या या बैठकीत माजी सरपंच राजेश काकडे तसेच विद्यमान ग्रामपंचायत सदस्य अनिल चव्हाण यांनी तरुण पुढे हा प्रस्ताव मांडला आणि तो सर्वानुमते मंजूर करण्यात आला.

नीरेमध्ये सध्या १९ मोठी मंडळे आहेत.२६ छोटी मंडळे आहेत. तर छोटी-मोठी धरुन ४७ गणेश मंडळे आहेत. यामध्ये छोट्या मंडळांनी आपला गणेशोत्सव पूर्णपणे रद्द केला आहे. चार मंडळाची स्वत:ची मंदीरे आहेत. ही मंडळी नित्यनियमाप्रमाणे त्या मंदिरामध्ये छोटी मूर्ती बसवणार आहेत. तर अन्य १५ मंडळे आपापली गणेश मुर्ती पोलीस स्टेशनच्या आवारातील शेडमध्ये बसवणार आहेत.

अंकुश माने सहाय्यक पोलीस निरीक्षक जेजुरी

नीरेकरांनी घेतलेला हा निर्णय अत्यंत चांगला निर्णय आहे. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर आम्ही पोलीस प्रशासनाने याबाबत लोकांना आवाहन केले होते. यासाठी त्यांनी चांगला प्रतिसाद दिला आहे आणि म्हणूनच आम्ही दिलेल्या शब्दाप्रमाणे नीरा पोलिस चौकीच्या आवारात जागा उपलब्ध करून देत आहोत. त्याठिकाणी गणेश मंडळाच्या मूर्ती बसवल्या जातील व एक आदर्श गणेश उत्सव या वर्षी सादर केला जाईल. याठिकाणी कोणत्याही प्रकारचे गर्दी होणार नाही.

न्यूज अनकट प्रतिनिधी: राहुल शिंदे

कृपया आपले प्रतिक्रिया कळवावी

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा