घरी परतण्यासाठी नागरिकांचा जीव धोक्यात घालून प्रवास

सोलापूर, दि.३०एप्रिल २०२० : कोरोना विषाणू रोखण्यासाठी सर्वत्र लॉकडाऊन करण्यात आले आहे. त्यामुळे जिल्ह्याच्या सीमा बंद करण्यात आल्या आहेत. मात्र उजनी धरणाच्या बॅक वॉटरमधून पुणे जिल्ह्यातून अनेक लोक होडीतून जीव धोक्यात घालून करमाळ्यात प्रवास करत असल्याची धक्कादायक बाब समोर आली आहे.
लॉकडाऊनमुळे जिल्हाबंदीचे कडक नियोजन सुरु आहे. पुणे जिल्ह्यातून करमाळ्यात येणारे रस्ते बंद आहेत. अशातच करमाळा तालुका हद्दीपासून सहा किलोमीटर अंतरावरील भिगवण स्टेशन येथे कोरोना रुग्ण आढळला आहे.
त्यामुळे कोरोनाची चिंता कायम आहे. असे असताना नागरिकांनी आहे तिथेच राहावे, असे आवाहन प्रशासनाकडून वेळोवेळी करण्यात येत आहे. मात्र, याकडे नागरिक दुर्लक्ष करताना दिसून येत आहेत. आपला जीव धोक्यात घालून होडीतून प्रवास करण्यात येत असल्याचे दिसून येत आहे.
मच्छीमार बोटीतून, जीव धोक्यात घालत, पुणे जिल्ह्यातील लोक पहाटे आणि संध्याकाळी करमाळा तालुक्यातील बॅक वॉटर परिसरातील गावात येत आहेत.
सध्या मासेमारी बंद आहे. मात्र, काही मासेमारी करणारे काहीशा रुपयांच्या आमिषापोटी धोका पत्करत असून स्वतःचा आणि इतरांचा जीव धोक्यात घालत आहेत.

न्युज अनकट प्रतिनिधी: प्रशांत श्रीमंदिलकर

कृपया आपले प्रतिक्रिया कळवावी

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा