ज्येष्ठ अभिनेते अरुण बाली यांचे निधन

मुंबई, ७ ऑक्टोबर २०२२: भारतीय चित्रपटसृष्टीतून एक दुःखद बातमी समोर आली आहे. विविध लक्षवेधी भूमिकांमधून आपल्या अभिनयाचा ठसा उमठवणारे बॉलिवूडचे ज्येष्ठ अभिनेते अरुण बाली यांचे निधन झाले आहे. ते ७९ वर्षांचे होते.

अरुण बाली मागील काही दिवसांपासून ते आजारी होते. ‘मायस्थेनिया ग्रॅव्हिस’ या न्यूरोमस्क्युलर आजाराशी झुंज देत होते. यानंतर त्यांना हिरानंदानी रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. अखेर आज पहाटे त्यांनी अखेरचा श्वास घेतला.

अरुण बाली यांचा जन्म २३ डिसेंबर १९४२ मध्ये लाहोर, पाकिस्तान येथे झाला होता. अरुण बाली यांनी त्यांच्या करिअरची सुरुवात ९० च्या दशकात केली होती. बाली यांनी आपल्या दीर्घ कारकिर्दीत अनेक चित्रपटांमध्ये काम केले. फक्त हिंदी नव्हे तर त्यांनी तेलुगू आणि पंजाबी चित्रपटांमध्येही काम करत आपला ठसा उमठवला आहे. त्यांनी ‘केदारनाथ’, ‘ ३ इडियट्स’ सारख्या गाजलेल्या चित्रपटांमध्ये महत्वाच्या भूमिका साकारल्या आहेत. यासह ‘पीके’, ‘रेडी’, ‘बर्फी’, ‘ओह माय गॉड’, ‘केदारनाथ’, ‘जमीन, ‘सौगंध’, ‘जंटलमन’, ‘फूल और अंगारे’, ‘खलनायक’ आणि ‘पानिपत’ अशा अनेक गाजलेल्या चित्रपटांमध्ये भूमिका साकारल्या आहेत.

टीव्ही मालिकांमध्ये होते प्रसिद्ध

बाली यांनी अनेक टीव्ही मालिकांमध्ये देखील काम केले होते. त्यांनी ‘नीम का पेड़’, ‘दस्तूर’, ‘चाणक्य’, ‘देख भाई देख’, ‘द ग्रेट मराठा’, ‘शक्तिमान’, ‘स्वाभिमान’, ‘देस में निकला होगा चांद’, ‘कुमकुम- एक प्यारा सा बंधन’, ‘वो रहने वाली महलों की’ ‘देवों के देव महादेव’ यासारख्या प्रसिद्ध आणि लोकप्रिय मालिकांमध्ये काम केले होते.

चाहत्यांनी वाहिली श्रद्धांजली

त्यांच्या निधनाची बातमी समजताच चाहते सोशल मीडियावर त्यांना श्रद्धांजली वाहणाऱ्या पोस्ट करत आहेत आणि त्यांच्या आत्म्याला शांती मिळावी यासाठी प्रार्थना करत आहेत.

न्यूज अनकट प्रतिनिधी – प्रज्ञा फाटक.

कृपया आपले प्रतिक्रिया कळवावी

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा