वन्यप्राणी- काळवीट/कृष्णमृग (Blackbuck)

काळवीट किंवा कृष्णमृग ही हरिणांची एक प्रमुख जात आहे. काळवीट कुरंग प्रकारातील असून ह्याचे शास्त्रीय नाव अँटिलोप सर्व्हिकॅप्रा आहे. हा पूर्णपणे भारतीय प्राणी आहे. काळवीट गुजरात आणि पंजाबपासून पूर्वेकडे बंगालपर्यंत आणि दक्षिणेकडे कन्याकुमारीपर्यंत हा आढळतो. पाकिस्तानातील काही भागात याचे वास्तव्य आहे. झुडपे अथवा पिके असलेल्या मैदानी प्रदेशात आणि मोठाली गवताळ मैदाने असणार्‍या उघड्या रानात हा राहतो. डोंगराळ प्रदेशात आणि घनदाट जंगलात हा नसतो.

काळवीटाची डोक्यासकट शरीराची लांबी सव्वा मीटर पर्यंत तर खांद्यापाशी उंची अडीच ते पावणेतीन फूट असते. नराची म्हणजे काळविटाची वरची बाजू, पार्श्व बाजू आणि पायांची बाहेरची बाजू गडद तपकिरी किंवा काळी असते मादीच्या पाठीच्या बाजूचा आणि डोक्याचा रंग पिवळसर करडा असतो दोहोंचीही खालची बाजू, पायांची आतली बाजू आणि डोळ्याभोवतालचा भाग पांढरा असतो. वयाच्या वाढीबरोबरच काळविटाचा रंग जास्त गडद होत जातो. फक्त नर काळविटालाच शिंगे असून ती दोन फुटापर्यंत लांब असतात. मादीला शिंगे नसतात. यांची दृष्टी अतिशय तीक्ष्ण असते. रंग, पिळदार शिंगे, टपोरे आणि चंचल डोळे आणि सडपातळ व बांधेसूद शरीर यांमुळे सगळ्या हरिणांमध्ये हा डौलदार व सुंदर दिसतो.

यांचे १५–५० जणांचे कळप असतात कधीकधी शेकडोंचेही असतात. एखादा वयस्क नर कळपाचा प्रमुख असतो. प्रत्येक लहान कळपाबरोबर एकच काळवीट असतो. माद्या अतिशय जागरूक असतात आणि धोक्याचा इशारा प्रथम त्याच देतात. तो मिळताच सबंध कळप वेगाने धावत सुटून सुरक्षित ठिकाणी जातो. वायुवेगाने पळणारे असल्यामुळे चपळ शिकारी कुत्रेही त्यांना पकडू शकत नाहीत. बऱ्याच वर्षांपूर्वी काळविटांची शिकार करण्याकरिता चित्त्यांना शिकवून तयार केले जायचे.

काळविट जवळजवळ दिवसभर चरत असतात, पण दुपारच्या कडक उन्हाच्या वेळी ते सावलीत विश्रांती घेतात. गवत निरनिराळी धान्ये आणि पाला यांचे मुख्य अन्न ‍‍‍‍‍‍‍‍‍‍‍‍आहे.सबंध वर्षभर यांची वीण चालू असते, तरी प्रजोत्पादनाचा मुख्य काळ फेब्रुवारी किंवा मार्च असतो. या काळात काळवीट आपल्या प्रतिस्पर्ध्यापासून कळपाचे रक्षण करतो. मादी एक किंवा दोन पिल्लांना जन्म देते. या हरिणांची आयुर्मर्यादा सरासरी १५ वर्षे असते.

भारतीय संस्कृतीत काळवीटाचं विशेष स्थान आहे. संस्कृतमध्ये या हरणाचा उल्लेख कृष्ण मृगाच्या रुपात आला आहे. हिंदू प्राचीन ग्रंथानुसार काळवीट कृष्णाचा रथ वाहताना दिसतो. अंदाज असा आहे की, सिंधूच्या खोऱ्यातले लोक यांची शिकार करून त्याचा भोजनात समावेश करत असत. अनेक ठिकाणी त्यांचे पुरातन अवशेष सापडले आहेत. मुघलांच्या काळातली काळवीटाची चित्रं प्रसिद्ध आहेत. राजस्थान मधील बिष्णोई समाज तर काळवीटाला देवासमान मानतो.

काळवीट शेड्यूल भारतीय वन्यजीव संरक्षण कायद्याच्या शेड्युल १ मध्ये येणारा प्राणी आहे आणि त्याच्या शिकारीवर पूर्णपणे बंदी आहे.काळवीट शिकारप्रकरणी सलमान खानवर चार गुन्हे दाखल करण्यात आले. तीन काळविटांच्या शिकारीप्रकरणी सलमानला पाच वर्षांची शिक्षा झाली होती. 

भारतात काळवीट राजस्थान, पंजाब, मध्य प्रदेश, महाराष्ट्र आणि गुजरात मध्ये सापडतात. काळविटाचा वावर मुख्यत्वे भारतातील शुष्क प्रदेशातील ओसाड माळरानांवर आहे. महाराष्ट्रात विशेषतः पश्चिम महाराष्ट्रातील पर्जन्य छायेतील प्रदेशात यांचे वास्तव्य आहे. अहमदनगर जिल्ह्यातील कर्जत तालुक्यातील रेहेकुरी येथे काळविटांचे अभयारण्य आहे. पुणे जिल्ह्यातील दुष्काळी दौंड इंदापूर, शिरुर, बारामती तालुक्यात व तसेच अहमदनगर व सोलापूर जिल्ह्यामध्ये ही हरणे दिसतात. सोलापूर जिल्ह्याच्या लगत आंध्रप्रदेशात, कर्नाटकातही काळविटे बऱ्याच प्रमाणात दिसून येतात. आंध्र प्रदेशनं त्याला राज्यप्राण्याचा दर्जा दिला आहे.

न्युज अनकट प्रतिनिधी- गुरुराज पोरे.

कृपया आपले प्रतिक्रिया कळवावी

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा