आकुर्डी, २५ जानेवारी २०२३ : मागील दोन वर्षांपूर्वी कोरोना काळात झालेल्या लॉकडाऊनमुळे तब्बल पाच ते सहा महिने पॉपकॉर्न, खारे दाणे व अन्य वस्तूंची विक्री करणाऱ्या छोट्या व्यावसायिकांनाही मोठा फटका बसला होता; परंतु गेल्या काही महिन्यांपासून व्यावसायिकांचे व्यवसाय सुरळीत होत असल्याने संसाराची गाडीही पूर्वपदावर येत असल्याचे दिसून येत आहे.
याविषयी अधिक माहिती अशी, की प्राधिकरण येथील पासष्टवर्षीय छोटे व्यावसायिक श्री. नारायण भिला पाटील यांना ‘न्यूज अनकट’चे प्रतिनिधी सतीश पाटील यांनी बोलते केले असता, त्यांनी सांगितले, की गेल्या पंधरा-सोळा वर्षांपासून मी हा व्यवसाय करतो. गाळा घेऊन अथवा दुकान किरायाने घेऊन व्यवसाय करणे शक्य नव्हते. त्यामुळे स्कुटीला नवीन लूक देऊन तीच उपयोगात आणली. पहाटे चार वाजता त्यांच्या दिवसाची सुरवात होते. सकाळी सहा ते अकरा वाजेपर्यंत दुर्गा टेकडी येथे, तर सकाळी अकरा ते रात्री आठपर्यंत संभाजी चौक, प्राधिकरण येथे केळी वेफर्स, नाचणी पापड, शेंगदाणे, फुटाणे, नाचणीचे वेफर्स आदी विविध गृहोपयोगी वस्तूंची विक्री करतो.
दरम्यान, अजूनही ते कोरोना नियमांचे पालन करून व्यवसाय करतात. विशेष म्हणजे स्कुटीवरही त्यांनी ‘ज्याच्या तोंडाला मास्क, त्याचा नाही कोणाला त्रास’, ‘ज्याच्या तोंडाला नाही मास्क, त्याचा सर्वांना त्रास’, ‘कोरोनाची रोगराई जाऊ दे, आम्हाला सुखात राहू दे’, ‘आम्ही कष्ट करू, चटणी-भाकरी खाऊ’, ‘आमच्या मनातील भीती जाऊ दे, आमच्याकडे लक्ष राहू दे,’ आदी कोरोनाविषयी घोषवाक्यांचे फलक लावले आहेत. त्यामुळे खरेदीसाठी आलेल्या ग्राहकांचे प्रथम स्कुटीवरील कोरोना नियमांचे फलक लक्ष वेधून घेतात. त्यामुळे ग्राहकही त्यांच्या कार्याची प्रशंसा करतात.
प्रतिक्रिया…
गेल्या पंधरा-सोळा वर्षांपासून मी हा व्यवसाय करतो आहे. त्यामुळे तब्येतही तंदुरुस्त राहून कुटुंबालाही हातभार लागतो. जोपर्यंत तब्येत साथ देते तोपर्यंत काम करीतच राहणार, असा मानस त्यांनी व्यक्त केला.
श्री. नारायण भिला पाटील, प्राधिकरण.
‘न्यूज अनकट’ प्रतिनिधी : सतीश पाटील