अहमदाबादच्या सराफाने रोहित शर्मासाठी तयार केली सोन्याची विश्वचषक ट्रॉफी

अहमदाबाद, १३ ऑक्टोंबर २०२३ : क्रिकेट विश्वचषक २०२३ मधिल सर्वात रोमांचक सामना भारत आणि पाकिस्तान यांच्यात येत्या शनिवारी म्हणजेच १४ ऑक्टोबर रोजी अहमदाबाद, गुजरातमध्ये होणार आहे. या सामन्यासाठी अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडियमवर सर्व तयारी पूर्ण झाली असून या हाय व्होल्टेज सामन्यासाठी चाहत्यांचा उत्साह शिगेला पोहोचला आहे. प्रेक्षक या सामन्याची आतुरतेने वाट पाहत आहेत.

क्रिकेट चाहत्यांचा हा उत्साह दाखवण्यासाठी अहमदाबादच्या एका ज्वेलरने ०.९ ग्रॅम वजनाची सोन्याची खास आणि उत्कृष्ट विश्वचषक ट्रॉफी बनवली आहे. रौफ शेख असे सोन्याची ट्रॉफी बनवणाऱ्याचे नाव आहे. रौफ शेख यांनी २०१४ साली १.२०० ग्रॅम वजनाची आणि त्यानंतर २०१९ मध्ये १ ग्रॅम वजनाची विश्वचषक ट्रॉफी बनवली होती.

आता २०२३ मध्ये त्यांनी ०.९ ग्रॅम वजनाची ट्रॉफी बनवली आहे. आगामी भारत-पाकिस्तान सामन्यात त्यांना उपस्थित राहण्याची संधी मिळाली तर सामन्यादरम्यान, ते ही ट्रॉफी भारतीय क्रिकेट संघाचा कर्णधार रोहित शर्माला देणार आहेत. रौफ शेख यांना ही सुवर्ण ट्रॉफी तयार करण्यासाठी सुमारे २ महिने लागले. १९८३ आणि २०११ नंतर भारतीय संघ २०२३ मध्ये तिसऱ्यांदा विश्वचषक चॅम्पियन होईल, अशी आशा रौफ शेख यांनी व्यक्त केली.

न्यूज अनकट प्रतिनिधी : सूरज गायकवाड

कृपया आपले प्रतिक्रिया कळवावी

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा