मामल्लापुरमशी सुमारे १७०० वर्षांपूर्वीच्या नात्यास जिनपिंग यांनी दिला उजाळा

मामल्लापुरम (तामिळनाडू) : चीनचे राष्ट्रपती शी जिनपिंग शुक्रवारी भारतात दाखल झाले. चेन्नईपासून ५७ किमी दूर मामल्लापुरममध्ये (महाबलीपुरम) पंतप्रधान मोदी यांनी त्यांचे स्वागत केले. तामिळनाडूच्या पारंपरिक वेशात मोदींनी जिनपिंग यांना अर्जुन तपोस्थळ, पंच रथ आणि प्रसिद्ध शोअर (किनाऱ्यावरील) मंदिर दाखवले. सातव्या शतकातील हे स्थान जागतिक वारसा स्थळ आहे. येथे येणारे जिनपिंग तिसरे चिनी नेते आहेत. सातव्या शतकात प्रसिद्ध चिनी प्रवासी युवॉन त्साँग आणि १९५६ मध्ये तत्कालीन राष्ट्रपती झाऊ एन लाई यांनी येथे भेट दिली होती. मामल्लापुरमशी चीनचे १७०० वर्षांपूर्वीचे नाते सांगत मोदींनी हे नाते अधिक दृृढ होईल, असे सांगितले.

चीनहून आणलेल्या कारने फिरले शी जिनपिंग एअर चायनाच्या विमानाने चेन्नईत उतरलेल्या जिनपिंग यांनी ५७ किमीचा प्रवास हेलिकॉप्टरएेवजी रस्तामार्गे केला. जिनपिंग यांच्यासाठी चीनहून हाँगशी कार आणण्यात आली. सत्तारूढ कम्युनिस्ट पक्षाचे संस्थापक माओ यांच्या काळापासूनच नेते ही कार वापरतात.

मोदींनी जिनपिंग यांच्या स्वागताचे ट्विट इंग्रजी, मँडरिन व तमीळमध्ये केले. लिहिले,’भारतात आपले स्वागत आहे राष्ट्रपती जिनपिंगजी!’

विमानतळावर पोहोचल्यावर जिनपिंग यांचे ढोल-नगारा आणि भरतनाट्यमने भव्य स्वागत करण्यात आले.

९० सदस्यांचे शिष्टमंडळ आले आहे सोबत परराष्ट्र मंत्रालयाचे प्रवक्ता रवीश कुमार म्हणाले,’अनौपचारिक शिखर परिषद भारत-चीनच्या उच्चस्तरीय संपर्काचा स्तर मजबूत करेल आणि भविष्याचा मार्ग दाखवेल.’ जिनपिंग ९० सदस्यांचे शिष्टमंडळ घेऊन भारतात आले आहेत. शनिवारी सकाळी ते चेन्नईत मोदींशी चर्चा करतील. त्यानंतर ते शिष्टमंडळासह नेपाळला रवाना होतील.

मोदी-जिनपिंग यांच्यात ६ तास गप्पा रंगल्या, ५० मिनिटे चर्चाही झाली; पण संयुक्त वक्तव्य, पत्रकार परिषद नाही

काय केले : सोबत नारळपाणी प्यायले तीन मंदिरांचे दर्शन सी साइड वॉक सांस्कृतिक कार्यक्रम

महाबलीपुरम / चेन्नई : तामिळनाडूतील ऐतिहासिक शहर महाबलीपुरममध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी व चीनचे राष्ट्रपती शी जिनपिंग यांच्यात दुसरी अनौपचारिक चर्चा झाली. मोदी व जिनपिंग यांच्यात ५० मिनिटे समाेरासमोर चर्चा झाली. मोदी व जिनपिंग हे सुमारे ६ तास सोबत होते. परंतु उभय नेत्यांनी त्याबाबत काहीही वक्तव्य जारी केले नाही किंवा पत्रकार परिषदही घेतली नाही. त्यामुळे चर्चेचा तपशील जाहीर झाला नाही. जवाहरलाल नेहरू विद्यापीठातील सेंटर फॉर साऊथ-ईस्ट आसियान स्टडीजचे संचालक राम दीपक म्हणाले, ही परिषद कूटनीतीच्या कक्षेबाहेरील संवादासाठी होती. दोन्ही नेत्यांना परस्परांना जाणून घेण्याचा अवधी मिळावा आणि त्यातून कोणत्याही मुद्द्यावर मोकळेपणाने बोलता यावे, या उद्देशाने या अनौपचारिक बैठकीचे आयोजन करण्यात आले आहे. अनौपचारिक बैठकीला काही दिशा नसल्याने चर्चा निरर्थक मानण्याचेही कारण नाही. अशा बैठकीतून नेत्यांमध्ये कोणत्याही मुद्द्यावर चर्चेसाठी संवाद सुलभता येण्यास मदत होते. त्यातून इतर द्विपक्षीय चर्चेला आणखी पुढे घेऊन जाण्यासही मदत होऊ शकते.

गेल्या वर्षी वुहानमध्ये पहिली अनौपचारिक बैठक झाली होती. त्यात मोदी व जिनपिंग यांच्यात सुमारे १० तास चर्चा झाली होती. यादरम्यान ७ कार्यक्रम झाले होते. त्यात ४ बैठका समाेरासमोर झाल्या होत्या. बैठकीत चहाचा अास्वाद घेणे, लेक साइड भ्रमंती, बोटीतून प्रवास, संग्रहालय पर्यटनाचा समावेश होता.

मोदी व जिनपिंग यांनी तीन पौराणिक स्थळांना भेट दिली, सांस्कृतिक नृत्याचाही आनंद घेतला मोदी व जिनपिंग यांनी महाबलीपुरममध्ये तीन पौराणिक स्थळांना भेट दिली. अर्जुनाचे तपस्यास्थळ, पंचरथ व शोर मंदिराचा त्यात समावेश आहे. शोर मंदिरात जिनपिंग व मोदींनी सांस्कृतिक नृत्याचा आनंद घेतला. येथे विश्रांतीदरम्यान माेदी व चीनच्या राष्ट्रपतींसाठी नारळपाणी देण्यात आले होते. मोदींनी आपल्या हातांनी त्यांना नारळपाणी दिले. या वेळी दोन्ही नेत्यांनी सोबतच्या चिनी कर्मचाऱ्यांशी काही चर्चाही केली. मोदी व जिनपिंग यांनी सोबतच पंचरथातून भ्रमंती केली. महाभारतातील पात्रांच्या नावे पंचरथ बनवण्यात आला. सातव्या शतकात पल्लव राजांनी त्याची निर्मिती केली होती.

कृपया आपले प्रतिक्रिया कळवावी

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा