पुणे, २७ डिसेंबर २०२०: राष्ट्रवादी महिला काँग्रेसच्या वतीने आज राज्यभरात केंद्र सरकारने केलेल्या गॅस सिलिंडर दरवाढीच्या विरोधात आंदोलन करण्यात आले. पुण्यातील मंडई येथे चुल पेटवून दर वाढीचा निषेध नोंदविण्यात आला.
मागील १५ दिवसांमध्ये केंद्रातील भाजपा सरकारने एलपीजी गॅस सिलिंडरच्या किंमतींमध्ये १०० रुपयांनी वाढ केली आहे. मागील एक वर्षामध्ये करोना कालावधीत लोकांच्या रोजगाराचा प्रश्न निर्माण झालाय, अर्थव्यवस्था कोलमडली आहे. अशी परिस्थिती असताना केंद्र सरकार देशातील सामान्य नागरिकांना स्वस्त दरांमध्ये स्वयंपाकासाठी वापरला जाणार एलपीजी गॅस आणि इंधन उपलब्ध करुन दिलासा देणारा निर्णय घेण्याऐवजी असंवेदनशीलता दाखवत दरवाढ करत आहे.
गॅसचे दर कमी केले नाहीत तर आमचे पुढचे लक्ष्य हे पेट्रोलपंपावर लावलेले सन्माननीय पंतप्रधान मोदीजींचे फ्लेक्स असेल, इतकं लक्षात असू द्या, असा इशारा या वेळी रूपाली चाकणकर यांच्या कडुन देण्यात आला.
यावेळी राष्ट्रवादी महिला काँग्रेसच्या प्रदेशाध्यक्षा रूपाली चाकणकर व सर्व पदाधिकारी व कार्यकर्त्या उपस्थित होत्या.
न्यूज अनकट प्रतिनिधी: ज्ञानेश्वरी आयवळे