नीरेतील आरोग्य कर्मचारी कोरोनावर मात करत पुन्हा लढाईस सज्ज

पुरंदर, २  सप्टेंबर २०२० :बारामती येथे आरोग्य केंद्रात तसेच नीरा येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात काम करणाऱ्या नीरेतील कोरोना बाधित आरोग्य सेविका व आरोग्य सेवक आज कोरोना मुक्त होऊन आज आपल्या घरी परतले आहेत. नीरेतील ग्रामस्थ व त्यांचे सहकारी कर्मचारी व पत्रकारांनी त्यांचे गुलाब पुष्प देऊन व टाळ्या वाजवून स्वागत केले. यावेळी आपण लवकरच कोरोनाच्या लढाईत उतरणार असल्याचे त्यांनी सांगितले.

बारामतीच्या आरोग्य विभागात एन.आर. एच.एम अंतर्गत कार्यरत असलेल्या व मुळच्या निरा-पिंपरे येथील रहिवासी असलेल्या ज्योती गणेश जाधव व त्यांचे पती गणेश जाधव हे कोरोनावर मत करून आज आपल्या घरी सुखरूप परतले. यावेळी  त्यांचे स्वागत मोठ्या उत्साहात करण्यात आले. या प्रसंगी प्राथमिक आरोग्य केंद्राचे कर्मचारी बापू भंडलकर, भाऊ चव्हाण, शेजारी (तलाठी) बाप्पूसाहेब देवकर, पुरंदर तालुका पत्रकार संघाचे उपाध्यक्ष राहुल शिंदे, सदस्य भरत निगडे,  तसेच त्यांचे मित्र, सहकारी, व शेजारी उपस्थित होते.
बारामती येथे कार्यरत असलेल्या ज्योती जाधव या बारामती शहरात राष्ट्रीय आरोग्य अभियाना अंतर्गत आरोग्य कर्मचारी म्हणून सेवेत असल्याने त्यांना दररोजचा  सर्वे करणे क्रमप्राप्त होते. त्याच दरम्यान त्यांच्यासह त्यांच्या सोबत काम करणाऱ्या इतर सहकाऱ्यांना कोरोनाची लागण झाली होती. त्यांचे पती गणेश जाधव हे सुद्धा नीरा प्राथमिक आरोग्य केंद्रात आरोग्य सहाय्यक असल्याने त्यांनी वेळीच काळजी घेत त्यांना होम आयसुलेशन द्वारे उपचार सुरू केले. ते स्वत: या काळात आपल्या पत्नी सोबत होते. गणेश जाधव यांनाही गेली १६ दिवस होम कॉरंटाइन रहावे लागले. पण त्यांनी वर्क फ्रॉम होम चालूच ठेवले होते. आरोग्यसेवा हीच ईश्वर सेवा माणून हे दांपत्य परिसरातील लोकांना सेवा देत असत. कोरोनामुक्त झाल्यानंतर हे दांपत्य आज आपल्या मूळ घरी परतले .यानंतर आता ते दोघे ही  कोरोनाच्या रणांगणात पुन्हा लढा देण्यास सज्ज झाले आहेत. जाधव दांपत्य पुढील काही दिवसांत पुन्हा आपल्या आरोग्य सेवेत रुजू होऊन लोकांना आरोग्य सेवा देत कोरोना संदर्भात जनजागृती करणार आहेत.
न्यूज अनकट प्रतिनिधी :  राहुल शिंदे

कृपया आपले प्रतिक्रिया कळवावी

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा