अजित पवार यांच्या बंडावर शालिनीताई पाटील यांचे मोठे विधान, शरद पवार धूर्त राजकारणी २०२४ पूर्वीच हिशोब चुकता करतील

मुंबई, ८ जुलै २०२३ : वसंतदादा पाटील यांच्या काळात शरद पवार यांनी केलेल्या बंडामागे एक विचार होता. अजित पवार यांनी केलेल्या बंडामागे कोणताही विचार नाही. केवळ त्यांना सत्ता आणि संरक्षण हवे आहे. केलेल्या अपराधांना झाकण्यासाठी त्यांना संरक्षण पाहिजे. त्यासाठी सत्तेत गेले. पण असल्या बेसवर ते फार काळ टिकणार नाहीत. शरद पवार मुत्सद्दी,आणि धूर्त राजकारणी आहेत. ते कुणाला माफ करत नाहीत. २०२४ पर्यंत वाट पाहण्याची गरज नाही. त्या आधीच ते हिशोब चुकता करतील, असे मोठे विधान माजी आमदार शालिनीताई पाटील यांनी केले आहे. यावेळी बोलताना शालिनीताई पाटील यांनी अनेक महत्त्वाचे दावेही केले आहेत. त्या माध्यमांशी संवाद साधत होत्या.

त्या म्हणाल्या ज्येष्ठ म्हणून माझा अजित पवार यांना सल्ला राहील, अर्थात तो त्यांनी मानावा अथवा मानू नये. त्यांनी केलेली ही चूक आहे, असे मला वाटते. ते भाजपकडे गेले म्हणजे आश्रयाला गेले आहेत. अपराध केले आहेत. त्यामुळे ते हे सर्व लपवायला गेले. लोकशाहीत खूप काळ हे टिकत नाही. परिस्थिती बदलते, नवे लोक येतील. सत्य हे सत्यच असते, असे सूचक विधान शालिनीताई पाटील यांनी केले. शरद पवार यांनीच अजितदादा यांना भाजपकडे पाठवल्याची चर्चा आहे. त्यावर या चर्चेत तथ्य नसल्याचे त्यांनी सांगितले. शरद पवार असला प्रयोग करणार नाहीत, असे त्यांनी स्पष्ट केले.

पंतप्रधान नरेंद्र मोदींना राज्यातील लोक सत्य सांगत नाहीत. मोदींना हे सत्य कळेल तेव्हा ते विचार करतीलच. पण एवढे मोठे अपराध केल्यानंतर कोर्टाने एफआयआर दाखल करायला सांगितले आहेत. ही साधी गोष्ट नाही. जे संरक्षण देतील त्यांना उद्या याचा गंभीरपणे विचार करावा लागेल. त्यांनी विचार करावा अशी विनंती राहील, असेही पाटील म्हणाल्या.

पूर्वीची आणि आताची परिस्थिती वेगळी आहे. ऐनवेळी शरद पवारांना सोडून जायचे होते असे नाही. तुम्हाला भाजपकडे जायचे होते तर भाजपच्या तिकीटावर उभे राहा. किंवा तुम्हाला वेगळा पक्ष काढायचा असेल तर वेगळा पक्ष काढून लढा. तुमच्या वागण्याला तात्त्विक पाया नाही, तुम्ही दरोडे घालून आलाय आणि संपत्ती लुटण्यासाठी सत्तेचा कौल मागत आहात. हे वर्षभरात जनतेपर्यंत गेल्याशिवाय राहणार नाही, जनता त्यांना साथ देणार नाही, असेही शालिनीताई पाटील म्हणाल्या.

न्यूज अनकट प्रतिनिधी : अनिल खळदकर

कृपया आपले प्रतिक्रिया कळवावी

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा