माळढोक पक्षी देशातून नामशेष होण्याच्या मार्गावर

       कधीकाळी माळढोक हा पक्षी भारतातील बारा राज्यात आणि पाकिस्तानच्या काही भागात आढळून येत होता. पंजाबात ‘टुगदार,’ महाराष्ट्रात माळढोक,राजस्थानात गोडावण अशा नावानं ओळखला जाणारा ‘ग्रेट इंडियन बस्टर्ड’ अर्थात माळढोक,आता देशातून नामशेष होण्याच्या मार्गावर असल्याचा अहवाल भारतीय वन्यजीव संस्थेनं दिला आहे.              या पक्ष्याबद्दल असलेलं अज्ञान हे एक कारण संख्या घटण्यामागे आहे.                                                                महाराष्ट्रात सोलापूर आणि नगर जिल्ह्यात माळढोकाच्या वाढीला पोषक वातावरण आहे, तिथूनच तो हद्दपारच झाला आहे. पण देशातूनही त्याचं अस्तित्व संपण्याच्या मार्गावर आहे. दुष्काळाचं अचूक निदान करणारा हा पक्षी. माळढोकाची मादी जमिनीवरील खड्ड्यात अंडी घालते. पाऊस पडणार नसेल तर ती अंडी घालत नाही. निसर्गातील बदलाची, पर्यावरणाच्या समतोलाची नेमकी जाणीव असणारा हा पक्षी आहे. अभयारण्य करूनही तो राखता आलेला नाही. उच्च दाबाच्या वीजप्रवाहाचे वहन करणाऱ्या तारांमुळे त्यांची संख्या कमी झाल्याचा निष्कर्ष अहवालात काढलेला आहे.                     शेतकरी आणि सरकार यांच्यातील माळढोक अभयारण्याच्या सीमेवरून असणारा संघर्ष यातून तसेच चवदार मांसामुळे हि त्यांची सर्रास हत्या झाली आहे. त्याचप्रमाणे माळरानावरील गवताळ कुरणे महाराष्ट्रातच नव्हे, तर देशाच्या अन्य भागांतही अभावाने आढळतात. माळढोकाचा रहिवास अशा कुरणातच असतो. त्या कुरणातील किडे हे त्याचे अन्न. पठारी भागातील चराऊ कुरणांतील त्याची भटकंती हे दृश्‍य विलोभनीय तर होतेच; पण त्याच्या जीवनपद्धतीविषयी अभ्यासकांना अवगत करणारे होते.                                                                                                       वाढत्या औद्योगीकरणाचा फटका निसर्गचक्राला बसला आहे. मोबाईल टॉवरमुळे चिमण्या नाहीशा होत आहेत, तसा हा पक्षीही संपत आहे. अशा वेळी त्यांची कृत्रिम पैदास करायला हवी. हंगेरीतील अभयारण्यात ‘हौबारा बस्टर्ड’ या माळढोकच्या कुळातील पक्षाच्या संवर्धनासाठी असे प्रयत्न करण्यात आले आहेत. माळढोकांची संख्या कमी होणे ही माणसाची संवेदनशीलता लोप पावत असल्याचेही लक्षण आहे. इंटरनॅशनल युनियन फॉर कन्झर्वेशन ऑफ नेचर-आययूसीएनच्या ‘रेड लिस्ट’ मध्ये लुप्तप्राय प्रजाती म्हणून नोंद झालेल्या माळढोक पक्ष्याला वाचवण्यासाठी सँच्युरी नेचर फाऊंडेशन, कन्झर्वेशन इंडिया आणि द कार्बेट फाऊंडेशन यांनी आपत्कालीन मोहीम सुरू केली आहे. जगभरात पक्ष्यांना वाचवण्यासाठी वापरल्या जाणाऱ्या रणनीतीचा वापर या मोहिमेसाठी करण्यात आला आहे. यात प्रामुख्याने कृत्रिम प्रजनना वर भर देण्यात येणार आहे. भारतीय वन्यजीव संस्थेने, माळढोक पक्ष्यांच्या  कृत्रिम प्रजननासाठी कार्यक्रम आखला आहे.  माळढोक पक्ष्यांची अंडी गोळा करुन ती उबवायची. त्यानंतर पर्यावरणाचा अंदाज घेऊन त्याची दुसरी आणि तिसरी पिढी जंगलात सोडायची, असा हा कार्यक्रम आहे. यासाठी किमान दीड दशकांचा कालावधी लागू शकतो.                                  सध्याच्या स्थितीत राजस्थानमधील जैसलमेर आणि कोटा येथे माळढोकचे प्रजनन आणि उबवणी केंद्र आहे. गेल्या ५० वर्षांत ९० टक्के माळढोकचे अस्तित्व नाहीसे झाले आहे. या पक्ष्याच्या अलीकडच्या सर्वेक्षणात १५०पेक्षाही कमी ठिकाणी त्यांचे अस्तित्व राहिले आहे. या सर्वेक्षणात मध्यप्रदेशातून तर ते कधीचेच नाहीसे झाल्याचा निष्कर्ष आहे, तर महाराष्ट्रात त्यांची संख्या केवळ आठ इतकी आहे. भारतीय वन्यजीव संस्था (डेहराडून) व भारतीय विज्ञान संस्था (बंगळुरू) येथील संशोधकांनी केलेल्या अभ्यासात या पक्ष्यांमध्ये एक कमी अनुवंशिक विविधता आढळून आली. त्यावरून त्यांची संख्या गेल्या अनेक वर्षांपासून कमी कमी होत जाऊन संपण्याच्या मार्गावर असल्याचे निष्पन्न झाले. माळढोक पक्ष्यांचा अधिवास नष्ट होणे हे देखील त्यामागचे एक कारण आहे. याशिवाय शिकार हे देखील महत्त्वाचे कारण आहे. त्यांच्या संरक्षणासाठी कृत्रिम प्रजननासारखे काही प्रयोग राबवण्यात आले, पण ते अयशस्वी ठरले. उच्च दाबाच्या विद्युत तारा हे देखील त्यांची संख्या कमी होण्यामागील एक कारण आहे. राजस्थानच्या थार क्षेत्रात प्रत्येक वर्षी उच्च दाबाच्या वीज वाहिन्यांमुळे किमान १८ पक्ष्यांचा मृत्यू होतो.म्हणूनच सँच्युरी नेचर फाऊंडेशन, कन्झर्वेशन इंडिया व द कार्बेट फाऊंडेशन यांनी एकत्र येऊन माळढोकच्या बचावासाठी हा शेवटचा प्रयत्न सुरू केला आहे तसेच वन्यजीवांच्या संरक्षण व संवर्धनासाठी ‘वन्यजीव अधिवासाचा एकत्रित विकास’ ही केंद्राद्वारे प्रायोजित एक योजना पण कार्यरत आहे. ज्या ठिकाणांहून हे पक्षी मोठय़ा संख्येने उडतात, त्या ठिकाणांवरील उच्च दाबाच्या वीज वाहिन्या भूमिगत करण्याचा प्रस्ताव आहे. तसेच या तारांवर रिफ्लेक्टर लावण्याचा सल्ला देण्यात आला आहे. यामुळे वीज वाहिन्यांमध्ये पक्षी दुर्घटनाग्रस्त होण्यापासून वाचू शकतील. जगात काही ठिकाणी हा प्रयोग करण्यात आल्यानंतर माळढोकच्या मृत्यूची संख्या त्यात कमी झाल्याचे सकारात्मक निष्कर्ष मिळाले आहेत.याव्यतिरिक्त माळढोकच्या अधिवासात गवताळ प्रदेश संरक्षित करण्याची मोहीम राबवली जाणार आहे.                          सद्यस्थितीत भारतातील माळढोक संख्या अशी आहे. मध्यप्रदेश–शून्य, महाराष्ट्र– पाच ते सात, गुजरात – ५०पेक्षा कमी,राजस्थान – ९० ते १२५ विदर्भात माळढोकचे अस्तित्व काही वर्षांपूर्वी बऱ्यापैकी होते. नागपूरजवळ उमरेड-भिवापूर आणि चंद्रपूरजवळ वरोरा-भद्रावती येथे त्याचे अस्तित्व होते. आता वरोऱ्याला एक-दोन दिसले तर दिसतात. शिकार व अधिवास नष्ट होण्यामुळे माळढोक पक्ष्यांचे अस्तित्व आता नाममात्र राहिले आहे. भारतात खूप कमी माळढोक पक्षी आता अस्तित्वात राहिले आहेत. पण आता त्याच्या बचावासाठी विशेष मोहीम आखण्यात आली आहे.                                                                                                                                                -गुरुराज पोरे 

एक प्रतिक्रिया

कृपया आपले प्रतिक्रिया कळवावी

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा