आमदार रोहित पवारांच्या वाढदिवसानिमित्त विद्यार्थ्यांना ७० हजार झाडांचं वाटप

बारामती, २७ सप्टेंबर २०२०: माझ्या वाढदिवसाच्या निमित्तानं समाजासाठी, निसर्गासाठी आपल्या हातून थोडं-फार काम होत असंल तर माझ्यासाठी या कामाचा आनंद अधिक असल्याचे कर्जत-जामखेड विधानसभाचे आमदार रोहित पवार यांनी बोलताना सांगितलं. पवार यांच्या वाढदिवसानिमित्त विविध कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलं होतं.

दि.२७ सप्टेंबर रोजी आमदार रोहित पवार यांच्या वाढदिवसाचं औचित्य साधुन रयत शिक्षण संस्थेचे श्री नागेश विद्यालय जामखेड याठिकाणी आयुर्वेदीक वृक्ष, खाऊ, मास्क व आयुर्वेदीक वृक्षाची माहिती पुस्तीका वाटप कार्यक्रम प्रसंगी पवार बोलत होते.पवार पुढे म्हणाले की, आयुर्वेद ही भारतानं जगाला दिलेल्या अनेक मौल्यवान गोष्टींपैकी एक देणगी आहे. आपल्या पूर्वजांनी, ऋषी-मुनींनी अनेक वर्षे अभ्यास करुन आयुर्वेदाला जगात मानाचं पान मिळवून दिलं.

भारतामध्ये तर आयुर्वेदाला अनन्यसाधारण असं महत्त्व आहे. आपल्या पूर्वजांनी दिलेल्या या समृद्ध वारसाचं जतन व्हावं, निसर्गाचं संवर्धन व्हावं आणि आयुर्वेदाची माहिती सर्वत्र पोहोचावी असा हेतू समोर ठेऊन यंदा माझा वाढदिवस हा आयुर्वेदाचा प्रचार-प्रसार करणारा आणि पर्यावरण संवर्धन करणारा व्हावा, असं ठरवलं आणि त्यादृष्टीनं काम सुरू केलं आहे.

यंदा माझा ३५ वा वाढदिवस असल्यानं कर्जत व जामखेड या दोन्ही तालुक्यातील प्रत्येकी ३५ हजार अशा एकूण ७० हजार विद्यार्थ्यांना आयर्वेदीक झाडांची रोपं भेट म्हणून देण्याचं निश्चित केलं आहे. त्यानुसार गेल्या दोन दिवसांपासून पहिली ते दहावीच्या विद्यार्थ्यांना खाऊ, मास्क आणि त्यासोबत वड, हिरडा, बेहडा, बेल, आवळा, करंज, जांभूळ, अशोक, काटेसावर, गुलमोहर, जास्वंद, पारिजातक, कढीपत्ता, गवती चहा, पुदिना या झाडांपैकी एक रोप देण्यात आलं.

विद्यार्थ्यांनी या रोपांचं जतन करायचं. आपल्या आवडत्या व्यक्तीचं नाव त्या वृक्षाला देऊन त्याचा दरवर्षी वाढदिवसही साजरा करायचा, अशी संकल्पना आहे. यामुळं झाडाचे आयुर्वेदिक महत्त्व हे विद्यार्थ्यांना कळेल. विद्यार्थ्यांनाही ही संकल्पना खूप आवडली आहे. शिवाय विद्यार्थ्यांना आयुर्वेदिक वनस्पतींची माहिती असलेले एक माहिती पत्रकही यावेळी देण्यात आलं.

विद्यार्थ्यांनी आयुर्वेदाचाही अभ्यास करावा. याशिवाय सध्या कोरोनाची साथ असल्यानं एक लाख मुला-मुलींना खाऊसोबत मास्क आणि कोरोनाचा संसर्ग रोखण्यासाठी काय करावे, याबाबत जागृती करणारे पत्रक देण्यात आले. लहान मुलांना कोरोनाचा अधिक धोका असल्याने मतदारसंघातील अंगणवाडीतील ३६ हजार मुलांना खाऊ वाटण्यात आला

विद्यार्थी दिलेली झाडांची रोपं लावतील पुढील वर्षी वाढदिवस साजरा करतील, तो क्षण माझ्यासाठी अत्यंत आनंद आणि समाधान देणारा असेल असे पवार आपल्या भाषणात म्हणाले आणि वृक्ष संवर्धनासाठी विद्यार्थ्यांना शुभेच्छा दिल्या.

न्युज अनकट प्रतिनिधी: अमोल यादव

कृपया आपले प्रतिक्रिया कळवावी

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा