पुणे, ३० डिसेंबर २०२२ : भारतीय क्रिकेट संघातील धडाकेबाज खेळाडू ऋषभ पंतच्या कारला भीषण अपघात झाला असून, यामध्ये ऋषभ पंत गंभीर जखमी झाला आहे. दिल्लीहून ऋषभ घरी येत असताना त्याच्या कारला हा भीषण अपघात झाल्याची माहिती समोर आली आहे.
याविषयी अधिक माहिती अशी, की दिल्लीहून घरी परतत असताना ऋषभ पंतच्या कारला (डीएल- १०, सीएन- १७१७) भीषण मोठा अपघात झाला. अपघातस्थळी असलेल्या प्रत्यक्षदर्शींनी सांगितल्यानुसार, हम्मादपूर झालजवळ रुरकीच्या नरसन सीमेवर त्याच्या कारला अपघात झाला. ऋषभ पंतची कार रेलिंगला धडकली, ज्यानंतर कारने पेट घेतला. मोठ्या प्रयत्नानंतर कारची आग विझविण्यात यश आलं. ऋषभ पंतला डेहराडूनच्या मॅक्स हॉस्पिटलमध्ये उपचारासाठी आणण्यात आले आहे. तिथे त्याची प्लास्टिक सर्जरी केली जाणार आहे. खानपूरचे आमदार उमेश कुमार त्यांची प्रकृती जाणून घेण्यासाठी रुग्णालयात पोचले.
डॉक्टरांनी दिलेल्या माहितीनुसार ऋषभ पंतच्या कपाळावर आणि पायाला दुखापत झाली आहे. माहिती मिळताच पोलीस अधीक्षक स्वप्ना किशोर सिंह घटनास्थळी पोचल्या आहेत. सक्षम हॉस्पिटलचे अध्यक्ष डॉ. सुशील नागर यांनी सांगितले, की सध्या ऋषभ पंतची प्रकृती स्थिर आहे, त्याला रुरकीहून डेहराडूनच्या मॅक्स हॉस्पिटलमध्ये पाठविण्यात आले आहे. तिथे त्याची प्लास्टिक सर्जरी केली जाणार आहे.
नुकत्याच बांगलादेशविरुद्धच्या कसोटी मालिकेत ऋषभ पंतने अप्रतिम फलंदाजी केली. दुसऱ्या कसोटीत त्याचे शतक हुकले; पण त्याच्या उत्कृष्ट फलंदाजीच्या जोरावर त्याने या सामन्यात भारताला पुढे आणले होते. त्यामुळेच दुसऱ्या डावात महत्त्वाचे फलंदाज अपयशी ठरल्यानंतरही भारतीय संघाने सामना जिंकला; मात्र नुकतेच एकदिवसीय आणि टी-२० मधील खराब कामगिरीमुळे त्याला संघातून वगळण्यात आले होते.
‘न्यूज अनकट’ प्रतिनिधी : सतीश पाटील