मुख्यमंत्री माझी शाळा, सुंदर शाळा अभियानात गुरूकुल प्रायमरी स्कूल सातारा जिल्ह्यात प्रथम

सातारा, २७ फेब्रुवारी २०२४ : मुख्यमंत्री माझी शाळा, सुंदर शाळा अभियानांतर्गत खाजगी व्यवस्थापन शाळा गटात सातारा जिल्ह्यातून शाहुनगर, गोडोली सातारा येथील गुरुकुल प्रायमरी स्कूल या शाळेने पंचायत समिती अंतर्गत कोडोली केंद्र व सातारा तालुक्यातून या स्पर्धेसाठी आवश्यक असणारे विविध निकष पूर्ण करत प्रथम क्रमांक पटकाविला.

गुरुकुल एज्युकेशन सोसायटीचे अध्यक्ष राजेंद्र चोरगे यांच्या मार्गदर्शनाखाली गुरूकुल प्रायमरी, सेकंडरी स्कूल या इंग्रजी माध्यम शाळा विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक गुणवत्ता वाढीबरोबरच सर्वांगीण विकासासाठी विविध उपक्रम शाळेच्या माध्यमातून घेण्यात येतात. मुख्यमंत्री माझी शाळा, सुंदर शाळा या अभियान अंतर्गत केंद्रस्तरापासून ते जिल्हास्तरापर्यंत पोचण्यासाठी माध्यमिक विभागाच्या मुख्याध्यापिका शीला वेल्हाळ, प्राथमिक विभागाच्या मुख्याध्यापिका अनुराधा कदम, माध्यमिक विभागाच्या उपमुख्याध्यापिका सोनाली तांबोळी, जनसंपर्क अधिकारी विश्वनाथ फरांदे, सर्व शिक्षक, कर्मचारी वृंद व पालक शिक्षक संघ यांनी सक्रिय सहभाग नोंदविला.

पाच जिल्ह्यांचा समावेश असलेला विभागस्तरासाठी गुरूकुल प्रायमरी स्कूलची निवड झालेली आहे. यावेळी गुरूकुल एज्युकेशन सोसायटीचे अध्यक्ष राजेंद्र चोरगे म्हणाले की, सदर उपक्रमात सहभागी होताना शिक्षकांनी, विद्यार्थ्यांनी घेतलेले परिश्रम खरोखरच वाखणण्याजोगे आहेत. संस्थेच्या माध्यमातून शाळेत राबविलेले उपक्रमातील अनेक वर्षापासून असलेले सातत्य, प्रामाणिक प्रयत्न यामुळे शाळेला सातारा जिल्ह्यात प्रथम क्रमांक मिळाला. याचा आम्हा सर्व संचालक मंडळाला अभिमान आहे. शासनाने राबविलेल्या शिक्षण व्यवस्थेमधील उपक्रम कोणती शाळा अचूक राबविते, यासाठी केंद्र स्तरापासून ते राज्यस्तरापर्यंत ‘मुख्यमंत्री माझी शाळा, सुंदर शाळा’ ही स्पर्धा घेण्यात येत आहे. राज्यातील सर्व व्यवस्थापनांच्या व सर्व माध्यमांच्या शाळांमधील शिक्षक, पालक, विद्यार्थी व माजी विद्यार्थी यांच्यात शाळेप्रती उत्तरदायित्वाची भावना निर्माण व्हावी व त्याजोगे स्पर्धात्मक वातावरणातून विद्यार्थ्यांना शिकण्यासाठी आनंददायी व प्रेरणादायी वातावरण मिळावे. यासाठी भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर आदर्श शाळा योजनेअंतर्गत ‘मुख्यमंत्री माझी शाळा, सुंदर शाळा’ हे अभियान महाराष्ट्र शासन शालेय शिक्षण व क्रीडा विभागाच्या वतीने राबविण्यात येत आहे. या अभियानात शैक्षणिक गुणवत्ता, अध्ययन, अध्यापन, प्रशासन यात आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर, पर्यावरण संवर्धनाची जाणीव, सार्वजनिक व वैयक्तिक स्वच्छता, चांगले आरोग्य, राष्ट्रीय एकात्मतेची जाणीव, व्यवसाय शिक्षणाची तोंड ओळख, अंगभूत कला क्रीडा गुणांचा विकास या सर्व अंतर्भुत घटकांचा समावेश आहे. ‘मुख्यमंत्री माझी शाळा, सुंदर शाळा’ या अभियानात गुरुकुल प्रायमरी स्कूलने विभागस्तर व राज्यस्तरापर्यंत मजल मारण्यासाठी आनंद गुरव, मधुकर जाधव, नितीन माने, संजय कदम, उदय गुजर, दिपक मेथा, अंबाजी देसाई, जगदिश खंडेलवाल, हरिदास साळुंखे, सर्व शिक्षक व शिक्षकेतरवृंद, विद्यार्थी व पालक यांनी पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या.

न्यूज अनकट प्रतिनिधी : ओंकार सोनावले

कृपया आपले प्रतिक्रिया कळवावी

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा