वन्यप्राणी- चितळ हरीण (Spotted deer)

हरीण म्हणल की आपल्या डोळ्यासमोर जे येतं ते म्हणजे चितळ. लांब फांद्या आलेली शिंगे, अंगावर ठीपक्या ठिपक्यांची नक्षी, गोंडस चेहरा, मोठाले कळप अस चितळ हरिणाचे वर्णन. चितळ भारतात मोठ्या संख्येने आढळणार हरीण आहे. श्रीलंका, बांगला देश, नेपाळ व भारत या देशांत हे प्राणी गवताळ प्रदेश, जंगले आणि मोकळ्या वनांत आढळतात. भारतात हिमालयाच्या पायथ्यापासून ज्या ज्या ठिकाणी चरण्याजोगी कुरणे आणि मुबलक पाणी आहे, अशा वनांत मोठ्या संख्येने चितळ आढळतात. मुख्यतः देशभरातील सगळ्या व्याघ्र प्रकल्पात चितळ आहेत. महाराष्ट्रातील बव्हतांशी जंगलात चितळ मुबलक प्रमाणात आहेत. मुंबई सारख्या शहरात बोरिवली नॅशनल पार्क मध्ये चीतळांचा मुक्त वावर आहे.

चितळाच्या नराला दोन डौलदार शिंगे असून त्यांना तीन टोकदार फांद्या असतात. पहिली फांदी कपाळापाशी आणि शिंगाच्या बाकीच्या भागाशी साधारणपणे काटकोन करणारी असते. बाकीच्या दोन फांद्या वर टोकाला असतात. मादीला शिंगे नसतात. नराची मृगशिंगे दरवर्षी गळून पडतात. शिंगे गळून पडण्याचा कालखंड स्थानानुसार बदलतो. मध्य प्रदेश व दक्षिण भारतातील चितळांची शिंगे ऑगस्ट ते सप्टेंबर महिन्यात गळतात. गळून पडलेली शिंगे पौष्टिक अन्न म्हणून चितळ खातात. शिंगे गळून गेलेले नर कळपापासून वेगळे राहतात. नवीन शिंगे आल्यावर ते परत कळपात सामील होतात.

सगळ्या हरिणामध्ये चितळ सुंदर व आकर्षक दिसतो. चितळ मादीचा रंग नरासारखाच असून ती आकाराने नराहून लहान असते. पूर्ण वाढ झालेल्या नराची खांद्याजवळ उंची तीन फुटापर्यंत आणि वजन ८५ किलो पर्यंत असते. चितळाचा रंग तांबूस विटकरी असून त्यावर पांढरे ठिपके असतात. पोटाकडील भाग पांढरा असतो. पाठीवर डोक्यापासून शेपटापर्यंत गेलेला एक काळा पट्टा असतो.

मिलन काळात माद्यांवरून नरांमध्ये झुंजी होतात. शिंगांचा शस्त्राप्रमाणे वापर केला जातो. कळपाच्या मालकीसाठी नर शिंगाने परस्परांवर हल्ला करतात तेव्हा जंगलात शिंगाच्या टक्करीचा आवाज घुमतो. चितळांच आयुष्य वीस पंचवीस वर्षे आहे. चितळांचा विणीचा काळ ठराविक नाही. उन्हाळ्यात तसेच हिवाळ्यात त्यांचे प्रजनन होत असते. उन्हाळ्यात त्यांच मिलन अधिक होत असाव. चितळाची मादी एकावेळी एकाच पाडसाला जन्म देते. दर सहा महिन्यांनी मादी नव्या पाडसास जन्म देऊ शकते. पाडस चितळ तीन वर्षांनी प्रजननक्षम होते. सर्व शिकारी प्राण्यांचे चितळ हे आवडतं खाद्य आहे.

सस्तनी वर्गाच्या समखुरी गणातील मृग कुलात (सर्व्हिडी) चितळाचा समावेश होत असून त्याचे शास्त्रीय नाव ॲक्सिस ॲक्सिस आहे. जंगलात लंगूर माकड आणि चितळ यांची विशेष मैत्रीपूर्ण साथ असते. चितळांची तीक्ष्ण घ्राणेंद्रिये आणि झाडावर बसलेल्या लंगुरांची दूरवर पोहोचू शकणारी नजर यांच्या साहाय्याने ते एकमेकांना, अस्वल, बिबटे, रानकुत्रे आणि वाघासारख्या शिकारी प्राण्यांपासून विशिष्ट आवाज काढून सावध करतात आणि शिकार होण्यापासून ते वाचतात.

कमीत कमी दहा वीस चितळांचा कळप असतो, पण काही मोठ्या जंगलात शेकडो चीतळांचे कळप किंवा त्याहूनही अधिक संख्येने कळप आढळतात. त्यात निरनिराळ्या वयाचे नर, माद्या आणि पिल्ले असतात. चितळ सगळ्यांसोबत राहणारा प्राणी आहे. एकेका कळपात मुख्य दोन-तीन नर असतात. अनेकदा ते जंगलातील बऱ्याच तृणभक्षी प्राण्यांसोबत वावरतात. ते दिनचर आहेत. सकाळी व सायंकाळी ते चरतात आणि दुपारच्या वेळी विश्रांती घेतात. गवत हे त्यांचे मुख्य अन्न असले तरी झाडांची पाने, फुले आणि फळेही ते खातात.

न्युज अनकट प्रतिनिधी- गुरुराज पोरे.

कृपया आपले प्रतिक्रिया कळवावी

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा