तोंडापूर मध्यम प्रकल्पात जवळपास २०० मोटारीच्या साह्याने बेसुमार पाणी उपसा

जामनेर, जळगाव १६ एप्रिल २०२४ : जामनेर तालुक्यातील तोंडापूर मध्यम प्रकल्पात मार्च महिन्याच्या शेवटी ५०% च पाणी साठा शिल्लक राहिलाय. तोंडापूर धरणात आज रोजी २०० च्या जवळपास मोटारीने बेसुमार पाणी उपसा होत असल्यामुळे धरणाची पाणी पातळी दिवसेंदिवस कमी झाली आहे. याकडे प्रशासनाच्या वतीने गांभीर्यपूर्वक लक्ष देण्याची आवश्यकता आहे.

तोंडापूर मध्यम प्रकल्पातून अजिंठा लेणी, फर्दापुर गाव, वाकडी आणि तोंडापूर गावाला पिण्याचा पाणीपुरवठा केला जातो. परिसरातील बागायती शेती व दुबार पिके हि शेतकरी घेत आहे, त्यामुळे लघु सिंचन पाट बंधारे विभागाच्या वतीने पाणी उपसासाठी शेतकऱ्यांना परवानगी देण्यात येते. मात्र किती शेतकरी परवानगी घेतात हा प्रश्न आहे. आज धरणाच्या आत मोटारी चे मोठ्या प्रमाणात जाळे निर्माण झाले असून येथील तिन ट्रान्सफार्मरवर २०० च्या आसपास मोटारिंच कनेक्शन विज कंपनीकडून देण्यात आले आहे. तोंडापूर परिसरात केळी हे महत्वाचे पिक असल्याने मोठ्या प्रमाणात पाण्याची आवश्यक असते. असाच पाणी उपसा कायम राहिल्यास पाणी टंचाईच्या समस्यांना तोंड द्यावे लागणार असल्याने पाणी उपश्यावर निर्बंध घालणे आवश्यक आहे.

तोंडापूर धरणाच्या परिसरात अजिंठा डोंगर रांगा असल्याने वन्यप्राणीही मोठ्या प्रमाणात तोंडापूर धरणाच्या पाण्यावर अवलंबून आहेत. धरणासाठी ४०० हेक्टर च्या जवळपास जमीन संपादित करण्यात आली असून त्यातील जमिन मोठ्या प्रमाणात शिल्लक असून धरणाची पाणी पातळी वाढवण्यासाठी त्याची खोली वाढवावी, अशी मागणी शेतकरी वर्गातून होत आहे.

न्यूज अनकट प्रतिनिधी : भानुदास चव्हाण

कृपया आपले प्रतिक्रिया कळवावी

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा