सानियाच्या फायनलमधील पराभवानंतर पती शोएब मलिकची भावनिक पोस्ट, म्हणाला..

नवी दिल्ली, २८ जानेवारी २०२३ :भारतीय टेनिस स्टार सानिया मिर्झाच्या कारकीर्दीचा अंत पराभवाने झाला. ऑस्ट्रेलियन ओपनच्या मिश्र दुहेरीच्या अंतिम फेरीतील तिच्या पराभवाने सानियाचे चाहते निराश झाले आहेत. सानिया-बोपण्णा जोडीला अंतिम सामन्यात लुईसा स्टेफनी-राफेल माटोस या ब्राझीलच्या जोडीकडून ६-७, २-६ असा पराभव पत्करावा लागला होता. तिच्या या पराभवाचे दुःख तिचा पती आणि पाकिस्तानी क्रिकेटर शोएब मलिक याला देखील झाले असून, त्याने एक भावनिक पोस्ट केली आहे.

  • अनेकांसाठी तू प्रेरणा आहेस, अशीच खंबीर राहा

सानियाचा पती शोएब मलिकने आपल्या पोस्टमध्ये म्हटले आहे की, ‘तु क्रीडा क्षेत्रातील सर्व महिलांसाठी आशा आहे. तुझ्या कारकिर्दीत तु जे काही मिळवले आहे त्याचा आम्हाला खूप अभिमान आहे. तू अनेकांसाठी प्रेरणा आहेस. अशीच खंबीर राहा. तुझ्या अतुलनीय कारकिर्दीसाठी खूप खूप अभिनंदन’.

दरम्यान, स्पर्धेपूर्वीच सानिया मिर्झाने हा सामना आपला शेवटचा ग्रँडस्लॅम असल्याचे जाहीर केले होते. निवृत्तीपूर्वी सानिया यूएईमध्ये आणखी दोन स्पर्धा खेळणार आहे. प्रथम सानिया अबुधाबीमध्ये बेथानी मॅटेक सँड्ससोबत खेळेल. त्यानंतर, दुबई येथे होणाऱ्या WTA 1000 स्पर्धेद्वारे फेब्रुवारीमध्ये मॅडिसन कीजसह तिची कारकीर्द संपेल.

  • सानिया मिर्झाच्या घटस्फोटाच्या बातम्या

गेल्या काही दिवसांपासून शोएब मलिक आणि सानिया मिर्झाच्या घटस्फोटाच्या बातम्या येत आहेत. पाकिस्तानी मीडियानुसार, सानिया आणि शोएब आता वेगळे झाले असून, ते दोघे त्यांचा मुलगा इझान मलिक याचे सहपालक आहेत. पण सध्या दोघेही एकत्र राहत नाहीत. दोन्ही खेळाडूंनी अद्याप या प्रकरणाला अधिकृत दुजोरा दिलेला नाही.

‘न्यूज अनकट’ प्रतिनिधी : प्रज्ञा फाटक.

कृपया आपले प्रतिक्रिया कळवावी

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा