लॉकडाऊन आणि कोरोना संसर्ग

मागील वेळी केलेल्या लॉक डाऊनने कोरोनाचे पेशंट कमी झाले न्हवते. उलट कोरोनाचे पेशंट वाढल्यावर लॉकडाऊन शिथिल करण्यात आला होता आणि हळू हळू निर्बंध उठवले गेले होते. तुम्ही या सगळ्या गोष्टी विसरला आहात का ? लॉक डाऊन काळामध्ये आपण टेस्टिंग लॅब वाढवल्या आणि बेडची क्षमता वाढवली. क्वारंटाईन सेंटरची संख्या वाढवली आणि होम क्वारंटाईनचे नियोजन आपण लॉक डाऊन काळात लावू शकलो. याव्यतिरिक्त लॉक डाऊन काळात कोरोनाचा संसर्ग कमी झाला असे आपण अजिबात म्हणू शकत नाही.

कोरोनाचे रुग्ण कमी असताना केलेला लॉक डाऊन कोरोनाचे रुग्ण वाढल्यावर शिथिल केला गेला हा काही महिन्यांपूर्वीचा सामान्य नागरिकांचा प्रश्न आज सामान्य नागरिकच स्वतः विसरले आहेत. काळजी घेणं, मास्क न वापरणाऱ्यांवर कारवाई करणे या गोष्टी गरजेच्या आहेत. त्या आणखीन चांगल्या पद्धतीने फॉलो करायला हव्यातच. यात दुमत नाही…

अमरावती मध्ये सात दिवस लॉक डाऊन केला गेला आहे. त्याने खरच संसर्ग थांबणार आहे का ? कोरोनाचा संसर्ग अत्यावश्यक सेवांमधून देखील होणारच आहे. मागील वेळीच्या लॉक डाऊन मध्ये दिवसाला शेकडो लोकांच्या संपर्कात येणाऱ्या भाजी विक्रेते, बेकरी वाले, मेडिकल वाले यांना कोरोना झालेला आपण पाहिलाच आहे. आणि त्यांच्या संपर्कात आलेल्या कित्येकांना कोरोना न झाल्याची देखील उदाहरणे आहेत. मग यंदाच्या लॉकडाऊनने नक्की मिळणार काय ?

टेस्टिंग लॅबची संख्या वाढवली असताना, बेडची क्षमता वाढवली असताना आणि होम क्वारंटाईनचा अनुभव हाती असताना, गरज नसलेला लॉकडाऊन जनतेवर का लादला जातोय ? हा प्रश्न नागरिकांनी सरकारला विचारायला हवा…विचारा मग…

– पैगंबर शेख

कृपया आपले प्रतिक्रिया कळवावी

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा